• Tue. Jun 2nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शहराचं प्रवेशद्वारच बकाल; राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

ByEditor

Jun 2, 2026

पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करण्याची म्हसळावासीयांची मागणी

म्हसळा । वैभव कळस
म्हसळा तालुक्याची मुख्य बाजारपेठ आणि शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा ‘राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक (दिघी नाका)’ सध्या प्रशासकीय अनास्थेमुळे समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीच्या या प्रमुख चौकातील विकासकामांकडे संबंधित यंत्रणांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चोवीस तास वर्दळ, पण सुविधांचा दुष्काळ

दिघी नाका हा म्हसळा तालुक्याचा ‘स्वागत चौक’ मानला जातो. या चौकाला लागूनच मध्यवर्ती एसटी स्थानक, ग्रामीण रुग्णालय, रिक्षा व मिनिडोर स्थानक तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. यामुळे येथे २४ तास नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. लवकरच या परिसरात तालुका पोलीस ठाण्याचे भव्य प्रशासकीय संकुलही उभारले जाणार आहे. मात्र, इतके महत्त्व असूनही या ठिकाणी मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.

खड्ड्यांचे साम्राज्य अन् अपघातांची भीती

चौकातील मुख्य हमरस्ता सध्या मोठ्या खड्ड्यांमुळे विद्रूप झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नगर पंचायत आणि संबंधित शासकीय विभागांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला असताना, या खड्ड्यांमुळे तीव्र वाहतूक कोंडी, अपघात आणि पादचाऱ्यांना चालताना होणारा त्रास कमालीचा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऐतिहासिक पाणपोईला अतिक्रमणाचा विळखा

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेली सार्वजनिक पाणपोई आजही नागरिकांची तहान भागवत आहे. मात्र, या पाणपोईच्या समोरच परप्रांतीय व्यावसायिकांनी कथित अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे परिसराचा मोकळेपणा नष्ट झाला असून नगर पंचायत यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहराच्या सौंदर्याला गालबोट

सध्या या चौकात गटारांवरील अतिक्रमणे, रस्त्यालगत उभारलेल्या बेकायदेशीर झोपड्या, बेवारस टाकून दिलेल्या जुन्या हातगाड्या आणि अनधिकृत व्यावसायिक अडथळे प्रचंड वाढले आहेत. यामुळे तालुक्याचे प्रवेशद्वार अत्यंत बकाल दिसत असून शहराच्या सौंदर्याला गालबोट लागले आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर आणि नागरिकांवरही याचा नकारात्मक प्रभाव पडत आहे.

लोकप्रतिनिधी राजकीय घडामोडींत व्यस्त?

“जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या केवळ राजकीय घडामोडी आणि गणितांमध्ये व्यस्त आहेत. त्यांना नागरिकांच्या दैनंदिन समस्यांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही,” अशी घणाघाती टीका स्थानिक जनतेतून होत आहे. या बेकायदेशीर अतिक्रमणांमागे नेमके कोणाचे राजकीय पाठबळ आहे? आणि प्रशासन कारवाई करण्यास का कचरत आहे? याबाबत आता चौकाचौकांत चर्चांना उधाण आले आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन मुख्य रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, सर्व प्रकारची अनधिकृत अतिक्रमणे त्वरित हटवावीत,
चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी योग्य नियोजन करावे, स्वागत चौकाचे योग्यरीतीने सुशोभीकरण करून नामकरण करण्यात यावे ह्या मागण्या तत्परतेने पूर्ण कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे:

प्रशासनाने आता तरी सुस्तपणा सोडावा, अन्यथा पावसाळ्यात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!