• Wed. Jun 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महावितरणच्या ‘स्मार्ट मीटर’ विरोधात उरणमध्ये मनसे आक्रमक!

ByEditor

Jun 17, 2026

पहिले मंत्री, आमदार, खासदारांच्या घरात मीटर लावा; उरण महावितरण कार्यालयावर मनसेची धडक

उरण । अनंत नारंगीकर
सध्या महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता शासन ‘स्मार्ट मीटर’ लावून जनतेची लूट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या योजनेला कडाडून विरोध दर्शवला आहे. मनसे उरण तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. १७ जून) पदाधिकाऱ्यांनी उरण येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.

मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपअभियंता जगदीश गायकवाड यांची भेट घेऊन उरण तालुक्यात स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करावे, अशी जोरदार मागणी केली.

…तर आधी लोकप्रतिनिधींच्या घरात मीटर लावा!

यावेळी महावितरण प्रशासनाला ठणकावून सांगताना मनसे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत म्हणाले, “आज वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जनतेची दिशाभूल करून त्यांच्या खिशातून पैसे काढण्यासाठी शासन स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घालत आहे. शासनाला जर खरोखरच हे मीटर बसवण्याची घाई असेल, तर महावितरणने सर्वात आधी मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांच्या घरांमध्ये हे मीटर लावावे; म्हणजे त्यांना जनतेच्या त्रासाची आणि या समस्येची जाणीव होईल.”

मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा दिला दाखला

आंदोलनादरम्यान मनसेचे तालुका सचिव मंगेश वाजेकर यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा दाखला देत प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. तर मनसे महिला तालुकाध्यक्षा कविता म्हात्रे यांनी ग्राहकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन उपअभियंता जगदीश गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केले.

महावितरणची भूमिका

मनसेच्या आंदोलनानंतर महावितरणचे उपअभियंता जगदीश गायकवाड यांनी तालुक्यातील विजेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्मार्ट मीटर संदर्भातील जनभावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वस्त केले.

या आंदोलनाप्रसंगी मनसेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महावितरणचे त्रस्त ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकभावना लक्षात घेता उरणमध्ये स्मार्ट मीटर सक्तीचे केल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!