धाटाव | शशिकांत मोरे
‘रक्तदान हेच जीवनदान असून आपण केलेले रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकते,’ हाच सामाजिक संदेश आत्मसात करत रोहे येथील जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल ३१२ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या यशस्वी सामाजिक उपक्रमाबद्दल रोहा नगरपरिषद, स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे रक्तपेढी, वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, डॉक्टर भट नर्सिंग होम आणि गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आजचे युग हे गतिमानतेचे युग असून सर्वत्र दळणवळणाचे जाळे पसरले आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गांवरील अपघातांच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी अपघातग्रस्तांना तातडीने रक्ताची गरज भासते आणि वेळेत रक्त न मिळाल्यास रुग्णांना आपला जीवही गमवावा लागतो. हेच गांभीर्य ओळखून नागरिकांनी रक्ताचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि कुठलाही गैरसमज न ठेवता सामाजिक भान म्हणून रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे. रोहा नगरपरिषद व इतर आयोजकांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिरातील नागरिकांचा मोठा सहभाग कौतुकास्पद ठरला आहे.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे म्हणाल्या की, नगराध्यक्षपदावर काम करीत असताना शहराच्या विकासकामांच्या प्रश्नासोबतच नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. ‘आरोग्य हीच धनसंपदा’ असल्याने नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यावर आमचा नेहमीच भर राहणार आहे, याचकरिता आम्ही सातत्याने विविध आरोग्य तपासणी शिबिरे राबवीत आलो आहोत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे सांगताना त्यांनी एक कौटुंबिक आठवणही उजाळा दिली. माझे आजोबा स्वर्गीय जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या जीवनकाळात तब्बल १०० वेळा रक्तदान केले होते, त्यांच्या याच प्रेरणेतून आणि जन्मदिनाचे औचित्य साधून आम्ही या शिबिराचे आयोजन करतो, असे त्यांनी सांगितले. तसेच यापुढेही नागरिकांच्या हितासाठी अशीच आरोग्यविषयक शिबिरे राबवणार असल्याचे स्पष्ट करत, या संपूर्ण उपक्रमाला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत असल्याचे नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी आवर्जून नमूद केले.
