• Thu. Jun 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन प्रांत कार्यालयात ‘एसीबी’ची धडक कारवाई; ३० हजारांची लाच घेताना अव्वल कारकून, शिपाई रंगेहात जेरबंद!

ByEditor

Jun 18, 2026

सातबारा दुरुस्तीसाठी मागितली होती ६० हजारांची लाच; अलिबाग ‘एसीबी’च्या कारवाईने महसूल विभागात खळबळ

​श्रीवर्धन | संदेश घोलप
सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक उघड करणारे एक खळबळजनक प्रकरण श्रीवर्धनमध्ये समोर आले आहे. श्रीवर्धन उपविभागीय कार्यालयातील (प्रांत कार्यालय) अव्वल कारकून आणि शिपायाला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी रंगेहात अटक केली. सातबारा उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी चक्क ६० हजार रुपयांची लाच मागून, त्यातील पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​नितीन पवार (अव्वल कारकून) आणि सचिन पाटील (शिपाई, दोघेही कार्यरत – उपविभागीय कार्यालय, श्रीवर्धन) अशी लाचखोर शासकीय कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

​दोन महिन्यांपासून शेतकऱ्याची अडवणूक

​मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील पाबरे येथील एका शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित होते. या कामासाठी शेतकरी प्रांत कार्यालयाचे उंबरठे झिजवत होता. मात्र, हक्काचे काम करून देण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दोन महिने मानसिक त्रास सहन केल्यानंतर, लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने अत्यंत धाडसाने ‘एसीबी’कडे रीतसर तक्रार नोंदवली.

​’एसीबी’चा सापळा आणि नाट्यमय कारवाई

​तक्रारीची गोपनीय शहानिशा केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक (DYSP) सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग ‘एसीबी’च्या पथकाने बुधवारी (१७ जून) श्रीवर्धन प्रांत कार्यालय परिसरात सापळा रचला.

​ठरल्याप्रमाणे, ६० हजारांच्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३० हजार रुपयांची रोकड घेऊन तक्रारदार शेतकरी कार्यालयात पोहोचला. अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांनी ही रक्कम हातात घेताच, दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली आणि दोघांना रंगेहात दबोचले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे प्रांत कार्यालयात एकच पळापळ झाली.

​या दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या लाचखोरांच्या संपूर्ण कार्यकाळातील इतर प्रकरणांची आणि मालमत्तेची देखील चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ‘एसीबी’च्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!