४३ लिटर तयार दारू आणि रसायनासह मुद्देमाल नष्ट; दोन जणांवर गुन्हे दाखल
म्हसळा । वैभव कळस
पुणे येथे विषारी गावठी दारू प्राशनामुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात गावठी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर म्हसळा पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील खामगाव आदिवासीवाडी येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असून, तयार दारू, रसायन व साहित्य जप्त करून जागच्या जागी नष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई: साडेचार हजारांचा मुद्देमाल जप्त
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खामगाव आदिवासीवाडी येथे पोलिसांनी पहिला छापा टाकला. यावेळी सुनील नरेश वाघरे (वय २५) याच्या घराजवळ गावठी दारू निर्मितीचा अड्डा सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. या कारवाईत १३ लिटर गूळ व नवसागर मिश्रित पिवळ्या रंगाचे फेसयुक्त रसायन आणि ६० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस शिपाई अक्षय दौलत पुरी यांच्या फिर्यादीवरून म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७/२०२६ अन्वये ‘महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९’ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बीएनएसएस (BNSS) २०२३ च्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार बोंगाणे करीत आहेत.
दुसरी कारवाई: १४ लिटर गावठी दारू जप्त
त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी दुसरी कारवाई केली. खामगाव आदिवासीवाडी येथीलच मोतीराम बाबू पवार (वय २५) याच्या घराच्या आडोशाला प्लास्टिक कॅनमध्ये लपवून ठेवलेली १४ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
सुमारे १ हजार ४०० रुपये किमतीची ही दारू पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई शौकत मुल्ला यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपपोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे करीत आहेत.
नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
पुणे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे. तालुक्यातील बेकायदेशीर दारू व्यवसायाविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याची मागणी जनतेतून होत आहे. दरम्यान, संबंधित आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि पूर्व इतिहासाचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
तालुक्यातील काही वाड्या-वस्त्यांवर तसेच दुर्गम व पाणथळ जागी हातभट्टी दारू तयार करण्याचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली असून, हे सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
