रायगड : श्रीवर्धनमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला असून, ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या शहराला आता पक्षांतराचे ग्रहण लागले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकीटावर थेट मतदारांकडून विजयी झालेले नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी आपल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ठाणे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी चौगुले यांनी अधिकृतपणे हाती ‘धनुष्यबाण’ घेतले. या मोठ्या पक्षांतरामुळे श्रीवर्धनच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे मोठे नुकसान; राजकीय समीकरणे बदलणार
नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले हे श्रीवर्धनमधील एक तरुण आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला होता. मात्र, निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे ठाकरे गटाला या भागात मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आगामी काळात श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिंदे गटाचे वर्चस्व अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या प्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली असून, आगामी काळात तालुक्यातील उर्वरित पदाधिकारी व कार्यकर्तेही शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे श्रीवर्धन हा ठाकरेंचा बालेकिल्ला ही ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहे.
केवळ श्रीवर्धनच्या विकासासाठीच सत्तेची कास: नगराध्यक्ष अतुल चौगुले
“डिसेंबर २०२५ साली झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये श्रीवर्धन शहरातील मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन मला निवडून दिले. श्रीवर्धनच्या जनतेच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी सत्तेची कास धरणे आवश्यक आहे. श्रीवर्धनच्या भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वांगीण विकासाकरिताच मी आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे. हा प्रवेश करताना माझी शिवसेना ठाकरे गटाबाबत कोणतीही नाराजी नाही.”
— ॲड. अतुल चौगुले (नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपरिषद)
