महाड । मिलिंद माने
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पायरी मार्गावर मोठे दगड आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड प्रशासनाने २४ आणि २५ जून असे दोन दिवस हा मार्ग शिवभक्तांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाड तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पायरी मार्गावरील दगड आणि ढिगारा तातडीने हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड प्राधिकरणाचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. या कामासाठी लागणारा वेळ लक्षात घेता, शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी सध्या या मार्गाचा वापर करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंता
येत्या शनिवारी, २७ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या मोठ्या सोहळ्याच्या अवघ्या काही दिवस आधीच दरड कोसळल्याने शिवभक्त आणि स्थानिक ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. सोहळ्यासाठी गडप्रेमींची मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाने अधिक खबरदारी घेऊन मार्गाची सुरक्षा निश्चित करावी, अशी मागणी गडावर येणाऱ्या शिवभक्तांकडून केली जात आहे.
गडावरील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू असून, पुढील दोन दिवस पायरी मार्गाने प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
