• Wed. Jun 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी उरणमध्ये पुन्हा रणशिंग; रश्मिता पोपेटांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा

ByEditor

Jun 24, 2026

उरण । घन:श्याम कडू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, दिवंगत माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुकले गेले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेले मोर्चे, आंदोलने आणि जनआक्रोशानंतरही राज्य व केंद्र सरकारकडून अद्याप ठोस निर्णय होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्त्या रश्मिता पोपेटा यांनी विमानतळ रोडवरील चिंचपाडा पुलाखाली सुरू केलेल्या आमरण उपोषणाला दिवसेंदिवस जनसमर्थन वाढताना दिसत आहे.

विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मानसिकता राज्यकर्त्यांमध्ये दिसत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. सरकार जनतेच्या भावना, प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष आणि दिबांच्या योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून स्थानिक लोकप्रतिनिधीही यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. या फसवणुकीच्या भावनेतूनच आता पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडली आहे.

रश्मिता पोपेटा यांच्या उपोषणाची दखल घेत विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणस्थळाला भेटी देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समाधान म्हात्रे, रामतनू सेवक बबन पाटील, विवेक मोकळ, ॲड. गुरुनाथ म्हात्रे, आणि पारगावचे सरपंच प्रकाश डाऊर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

“दि. बा. पाटील हे केवळ एका समाजाचे किंवा भागाचे नेते नव्हते, तर प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडलेले लोकनेते होते. अशा महान नेत्याचे नाव विमानतळाला देणे ही केवळ नामकरणाची बाब नसून, तो स्थानिक जनतेच्या त्याग आणि स्वाभिमानाचा सन्मान आहे,” अशी एकमुखी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

सरकारने तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. दि. बा. पाटील यांचे नाव मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, या निर्धारामुळे आता हे आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!