• Wed. Jun 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत महिलेचा मृत्यू; नागाव परिसरात संतापाची लाट

ByEditor

Jun 24, 2026

विशेष मोहीम राबवून निष्काळजी पालकांवर गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी

​उरण | अनंत नारंगीकर
उरण शहरासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांकडून बेजबाबदारपणे दुचाकी चालवण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या अल्पवयीन वाहनचालकांच्या बेदरकारपणाचा मोठा फटका नागाव येथील एका कुटुंबाला बसला असून, एका भीषण अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षदा हेरंब म्हात्रे (रा. नागाव काठेआळी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण उरण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, अल्पवयीन वाहनचालक आणि त्यांच्या पालकांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी नागाव-म्हातवली मुख्य मार्गावरील स्टार कॉम्प्लेक्स परिसरात एका अल्पवयीन मुलाने नॉन-गिअर स्कूटर भरधाव वेगाने चालवत प्रथम केगाव येथील प्रशांत दर्णे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, त्याच वेगात या अल्पवयीन मुलाने आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या हर्षदा म्हात्रे यांना जोरदार धडक दिली.

​या भीषण अपघातात हर्षदा म्हात्रे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. अपघातानंतर त्यांना तातडीने खारघर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर तातडीने शस्त्रक्रियाही करण्यात आली, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. अखेर २२ जून २०२६ रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. एका निष्पाप महिलेचा अशा प्रकारे बळी गेल्याने नागाव परिसरात शोककळा पसरली आहे.

​पालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित अल्पवयीन मुलाच्या पालकांवर आणि गाडी मालकावर मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १९९ (अ) व इतर संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पालकांच्या निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप महिलेला जीव गमवावा लागल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

​उरण परिसरातील चित्र चिंताजनक

​या घटनेमुळे उरण परिसरातील अल्पवयीन वाहनचालकांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत उरणमध्ये​सकाळच्या शाळा-कॉलेजच्या वेळेत आणि क्लासेस परिसरात अल्पवयीन मुला-मुलींकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी चालवल्या जातात. मुख्य बाजारपेठा, रस्ते तसेच पीरवाडी समुद्रकिनाऱ्यासारख्या पर्यटनस्थळांवर अल्पवयीन मुलांचे स्टंट्स पाहायला मिळतात. ​अनेक अल्पवयीन मुले हेल्मेटशिवाय, ट्रिपल सीट आणि अत्यंत भरधाव वेगाने वाहने चालवून पादचाऱ्यांच्या व स्वतःच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत.

​प्रशासन जागे होणार का?

​उरण पोलीस आणि वाहतूक विभागाने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग आणि प्रमुख चौकांमध्ये विशेष मोहीम राबवून अशा अल्पवयीन चालकांवर, तसेच त्यांना गाड्या देणाऱ्या पालकांवर व वाहन मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. एका निष्पाप महिलेचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन ठोस पावले उचलणार का? असा संतप्त सवाल आता उरणकर विचारत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!