पेण | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह पेण तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदांचा सामूहिक राजीनामा दिला आहे. या धक्कादायक घडामोडीमुळे रायगडमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून मनसेला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप
पक्षाच्या अलीकडील संघटनात्मक निर्णयांवर आणि नव्या कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेवर राजीनामा देणारे पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराज होते. “अनेक वर्षांपासून पक्षासाठी रक्त-घाम गाळणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असून, त्यांना योग्य स्थान दिले जात नाही,” असा गंभीर आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.
स्थानिक नेतृत्वावर असंतोष
पक्षाच्या संपर्क नेतृत्वाच्या कार्यपद्धतीबाबतही कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पातळीवर कोणतेही निर्णय घेताना निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार अनेकांनी केली. याच वाढत्या नाराजीतून अखेर कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्ष सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
’शिवसेने’त (शिंदे गट) प्रवेशाची शक्यता
राजीनामा दिलेले संदीप ठाकूर आणि त्यांचे शेकडो समर्थक येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेनेत’ जाहीर प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सामूहिक राजीनाम्यामुळे रायगड जिल्ह्यात मनसेच्या संघटनात्मक ताकदीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता मनसेचे वरिष्ठ नेतृत्व या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरणार की पक्षातील ही गळती अशीच सुरू राहणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
