कोलाड । विश्वास निकम
रोहा तालुक्यातील मौजे बाहे येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका गरीब कुटुंबावर संकट ओढवले आहे. येथील मोलमजुरी करणारे ग्रामस्थ शंकर अंबाजी देवकर यांच्या घराची नवनिर्मित संरक्षण भिंत बुधवारी पहाटेच्या सुमारास नाल्याच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी देवकर यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बाहे गावचे रहिवासी शंकर देवकर यांचे राहते घर टेकडीवर असून, ते एका बाजूला अधांतरी आहे. आगामी पावसाळ्यात घराला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून देवकर यांनी गेल्या मे महिन्याच्या अखेरीस स्वतःच्या कष्टाची पुंजी जमा करून घराला संरक्षण देणारी भिंत बांधली होती. कुटुंबियांच्या मदतीने आणि जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करून जांभा दगड व सिमेंटमध्ये ही पक्की भिंत उभारण्यात आली होती.
मात्र, सोमवारपासून परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराशेजारील पावसाळी नाल्याला अचानक मोठा पूर आला. नाल्याच्या पाण्याचा प्रचंड दाब संरक्षण भिंतीच्या पायात घुसल्याने बुधवारी पहाटे ही भिंत पत्त्यांसारखी कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच बाहे गावचे पोलीस पाटील मनोज थिटे आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानुसार चिल्हे सजाचे तलाठी रोहित राजने यांनी तत्परता दाखवत घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा केला. नुकसानग्रस्त देवकर कुटुंबाला शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे तलाठी राजने यांनी या वेळी सांगितले.
