महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
पावसाळ्याची सुरुवात होताच श्रीवर्धन शहरासह परिसराला पुन्हा एकदा तीव्र वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे. मान्सूनचे आगमन होऊन अवघे दोन दिवसही उलटले नसताना, श्रीवर्धन शहरातील दांडा परिसर आणि लगतच्या ग्रामीण भागात तब्बल १५ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे संतप्त नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
‘पाऊस आला की लाईट गायब’; दरवर्षीचेच रडगाणे
श्रीवर्धनकरांसाठी “पाऊस आणि वीज गायब” हे समीकरण नवे राहिलेले नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च दाखवला जात असला, तरी किरकोळ पाऊस किंवा वाऱ्याचा वेग वाढल्यास तासन्तास वीज गुल होते. या अघोषित वीज कपातीमुळे स्थानिक व्यापारी, गृह उद्योग, ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या या समस्येवर महावितरण कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
जीव धोक्यात घालून काम करणारे कर्मचारी ‘रामभरोसे’
एकीकडे नागरिक विजेअभावी त्रस्त असताना, दुसरीकडे वादळी पावसात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महावितरणच्या ग्राउंड स्टाफचा (कर्मचाऱ्यांचा) सुरक्षेचा मुद्दाही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. अनेकदा बिघाड दुरुस्त करताना कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने (Safety Kits), आधुनिक उपकरणे आणि सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः कंत्राटी पद्धतीवर (Contractual) काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“महावितरणने केवळ कागदावर पावसाळापूर्व नियोजनाचे घोडे न नाचवता, प्रत्यक्ष जमिनीवर काम करावे. नागरिकांना अखंडित वीज मिळावी आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुरक्षा साधने व प्रशिक्षण दिले जावे.” अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
