पोयनाड (प्रतिनिधी): भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि ल्युमिनेक्सा सोलर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १ जुलै रोजी पेझारी येथील हॉटेल साई वाटिका येथे सकाळी १० ते १२ या वेळेत ‘एसबीआय सूर्य घर सोलर मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. एसबीआय बँक दिनाचे औचित्य साधून या विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेला’ प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांना सौर ऊर्जेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातील विविध शाखांमध्ये या मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. ‘सूर्य ऊर्जेचा स्मार्ट वापर, सुरक्षित भविष्याचा आधार’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात पोयनाड विभागातील नागरिकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या मेळाव्यात ग्राहकांना सोलर पॅनेल बसवण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्याची उपयुक्तता आणि यासाठी लागणाऱ्या सुलभ वित्तपुरवठ्याविषयी (सोलर लोन) सविस्तर माहिती दिली जाईल. विशेष म्हणजे, या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने अत्यंत आकर्षक दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, मेळाव्यात विश्वसनीय सोलर प्रदाते (व्हेंडर) स्वतः उपस्थित राहणार आहेत.
योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सूट आणि आकर्षक भेटवस्तू देखील ठेवण्यात आल्या आहेत. तरी पोयनाड व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसबीआयच्या वतीने करण्यात आले आहे.
