• Tue. Jun 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नेरळ–कळंब रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामावर प्रश्नचिन्ह; सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचा मनसेचा आरोप

ByEditor

Jun 30, 2026

अपघात वाढल्याने नागरिकांमध्ये संताप; अनुचित प्रकार घडल्यास गाठ मनसेशी – यशवंत भावरे यांचा प्रशासनाला इशारा

कर्जत । गणेश पवार
गेल्या तब्बल वीस वर्षांपासून रखडलेल्या नेरळ–कळंब जिल्हामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असली, तरी हे काम आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रस्त्याचे काम करताना पाळली जाणारी हलगर्जी, सुरक्षेचा पुरता अभाव आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम यामुळे वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भावरे यांनी केला आहे.

या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मागणीनंतर शासनाने अखेर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला मंजुरी दिली. मात्र, काम सुरू झाल्यापासून ठेकेदाराकडून सुरक्षा नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे.

बॅरिकेडिंग अभावी अपघातांचे सत्र

रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप भावरे यांनी केला. मार्गावर अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेले नाही, तसेच रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अंदाज येण्यासाठी कोणतेही फलक किंवा रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले नाहीत. या अर्धवट आणि असुरक्षित रस्त्यामुळे आतापर्यंत शेकडो लहान-मोठे अपघात घडले असून वाहनचालक जखमी झाले आहेत.

कामाच्या दर्जाबाबत संशय

सुरक्षेसोबतच या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरही स्थानिक पातळीवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम रेटले जात असल्याचे मनसेने म्हटले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार होणाऱ्या या रस्त्याच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर आताच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा…

“प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, तात्काळ सुरक्षा उपाययोजना लागू कराव्यात आणि संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी. या रस्त्यावर सुरक्षेअभावी भविष्यात कोणतीही अनुचित घटना किंवा जीवितहानी घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदाराची असेल. मनसे नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरेल आणि मग गाठ मनसेशी असेल.” – यशवंत भावरे (तालुकाध्यक्ष, मनसे, कर्जत)

दरम्यान, मनसेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेते का, आणि ठेकेदाराला दर्जेदार व सुरक्षित काम करण्यास भाग पाडते का, याकडे नेरळ-कळंब परिसरातील नागरिकांचे डोळे लागले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!