प्रवाश्यांची गैरसोय, नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गांवरील खांब नाक्यावर अनेक वर्षांपासून बसस्थानक होते. परंतु, मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणात हे बसस्थानक जमीनदोस्त करण्यात आले. परंतु याला १७ वर्षे झाली तरी त्या जागी अद्यापही नवीन बसस्थानक बांधण्यात आले नाही. यामुळे प्रवाशी वर्गाची गैरसोय होत असल्यामुळे खांब नाक्यावर नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब नाक्यावर गेली अनेक वर्षांपासून असलेले बसस्थानक गायब झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बसस्थानक नसल्यमुळे महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस थांबणे सोडाच तर रायगडमधील साध्या बसेस देखील थांबत नसल्याने खांबकडून कोलाडकडे तसेच खांबकडून नागोठणे, पालीकडे जाणारे कॉलेज व उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी वर्गाचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे.
खांब नाक्यावर बाहे, देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली, नडवली, खांब, वैजिनाथ, शिरवली, मुठवली, गोवे, पुगांव, मढाळी ते बळे गरबटपर्यंत वाडया, वस्त्या अशा साधारण २० ते २५ गावातील विद्यार्थी तसेच प्रवासी नागरिक मुंबईकडे अथवा महाडकडे जाण्यासाठी येत असतात. परंतु खांब नाक्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसस्थानक नसल्याने येथे कोणत्याही एसटी बसेस थांबत नाहीत. एखादी मुंबईकडून येणारी बस थांबली तर तिकीट मात्र वरसगांवचे देतात. बस थांबली नाहीच तर वरसगांववरून परत खांबकडे येण्यासाठी तिकीट काढावे लागत आहे. याचा संबंधितांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय अनेक वर्षांपासून बसस्थानक नसल्याने विद्यार्थी, स्थानिक नागरिक, अबालवृद्ध, प्रवाश्यांसह रुग्णांना भर ऊन-पावसात तासनतास वाहनांच्या प्रतीक्षेत रस्त्यालगत ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठी गायब झालेले बसस्थानक पुन्हा बांधून येथे येणाऱ्या-जाणाऱ्या एसटी बसेस थांबाव्या यासाठी संबंधित शासन, प्रशासन, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने लक्ष देऊन प्रवाश्यांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
मुंबई-गोवा हायवेवरील खांब नाका हे मध्यवर्ती ठिकाण असुन येथे २० ते २५ वाडया वस्त्या असुन येथे मुंबई तसेच महाडकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसहित ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग एसटीने प्रवास करण्यासाठी येत असतात. परंतु येथे अनेक वर्षांपासून बसस्थानक नसल्याने लांब पल्याच्याच काय रायगडमधील लोकल एसटी देखील बस थांबत नाही. यामुळे प्रवाशी वर्गाची गैरसोय होते. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणात येथील बसस्थानक तोडण्यात आले आहे परंतु, १७ वर्षे झाली तरी येथे बसस्थानक बांधण्यात आले नाही यामुळे प्रवाश्यांना उन्हपावसात रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. काल रक्षाबंधनासाठी निघालेल्या महिलांना तीन ते चार तास गाडयांची वाट पहावी लागली. एसटी बस थांबत नसेल तर महिलांना एसटी भाडयात सुट देऊन काय उपयोग?
अलंकार खांडेकर
सामाजिक कार्यकर्ते