• Thu. Apr 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बेकायदेशीर गोहत्या आणि गोमांस विक्री प्रकरणी तिघांना अटक

ByEditor

Aug 31, 2023

महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमक भूमिका

मिलिंद माने
महाड:
तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये गोहत्या करून बेकायदेशीर गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली. यादरम्यान आरोपी आणि गोरक्षक यांच्यामध्ये बाचाबाची आणि मारहाण झाली. त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गोरक्षक तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी कडक कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करण्याची घटना महाड शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर घडली.

राजेवाडी मोहल्ला परिसरात बेकायदेशीर गोहत्या करून गोमांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी गोरक्षकांनी आरोपींना मारहाण केली त्यामुळे आरोपींसह अन्य लोकांनी या गोरक्षकांवर हल्ला चढवला. रिहान रशीद आलेकर, रहमान अब्दुल करीम पालेकर, फरहान अब्दुल करीम पालेकर अशी अटक केलेल्या तीन आरोपांची नावे आहेत.

राजेवाडी गावामध्ये झालेल्या या घटनेचे वृत्त महाड शहर व आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखे पसरताच महाड शहर पोलीस ठाण्यात गर्दी जमण्यास सुरुवात झाली. महाड पोलीस ठाण्यात गर्दीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेचे आवाहन केले. मात्र, पोलीस जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर महाड शहर पोलिसांनी जमलेल्या जमावावर लाठी हल्ला केला त्यामुळे शांततेत जमलेला जमाव अखेर संतप्त झाला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष चेतन पोटफोडे व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याने ते आजच्या या गोवंश हत्या प्रकरणात हिंदूरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांसोबत असल्याने तो राग मनात धरून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी जाणीवपूर्वक या दोघांना दंगल सदृश्य परिस्थिती घडवण्यास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा त्या दोघांवर दाखल केला आहे.

या प्रकरणांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल होणार असून ज्या व्यक्तींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होत आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून मारहाणीचा तर गोरक्षकांकडून देखील मारहाणीची परस्पर विरोधी तक्रार दाखल केली जात आहे. तसेच पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दीतून पोलिसांवर धावून गेल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.

शांतता राखण्याचे आवाहन

महाडजवळील राजेवाडी गावामध्ये अवैध्यरित्या गोहत्या आणि गोमांस विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर महाड शहर पोलीस ठाण्या बाहेर गोरक्षकांनी गर्दी केली होती. यावेळी शहर पोलीस ठाण्याबाहेर तणाव निर्माण झाला. महाड पोलीस उपविभागीय अधिकारी एस. बी. काळे यांनी पोलिसांना पोलिसांचे काम करू द्या आपण शांतता राखा असे आवाहन केले. सदर घटनेचे वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरल्यानंतर विविध प्रकारे तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारित केले जात होते. त्याचप्रमाणे शहरांमध्ये जमा होण्याचे, मोर्चा काढण्याचे आव्हान देखील केले जात आहे. याप्रकरणी नागरिकांनी शांतता राखली पाहिजे. समाज माध्यमावर येणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास न ठेवता शांतता राखण्याची आव्हान देखील पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारच्या संदेशातून जातीय तणाव आणि वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

याप्रकरणी विविध चार गुन्हे दाखल झाले असून मूळ गुन्ह्यामध्ये असलेल्या तीन आरोपींविरोधात भादवि कलम 353 तसेच प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आरोपींच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये वीस ते पंचवीस गोरक्षकांनी मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार वीस ते पंचवीस गोरक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यासमोर पोलिसांवर धावून गेल्याप्रकरणी दोन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी दिली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!