• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेल्वे ट्रॅकवरील तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली!

ByEditor

Aug 31, 2023

गारळ गावातील २३ वर्षीय तरुणी असल्याचे पोलीस तपासात उघड

सलीम शेख
माणगांव :
गारळ गावचे हद्दीत रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वे रुळावर एका तरुणीचा मृतदेह मिळाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या अनोळखी तरुणीचा चेहरा विद्रूप झाल्याने माणगाव पोलिसांना या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे मोठे आव्हान होते. मात्र संध्याकाळी ही तरुणी घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी शोध सुरु केल्यानंतर गारळ गावचे हद्दीत रेल्वे ट्रॅकवर सापडलेला मृतदेह हा अजिता संदीप दसवते (वय वर्ष २३ रा. गारळ ता. माणगांव) हिचा असून पोलिसांच्या तपासात हे निष्पन्न झाले. मयत अजिता ही मुंबई येथे कामाला होती. ती मागील २ दिवसांपूर्वी आपल्या मूळगावी गारळ या ठिकाणी आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात अ. मृ .रजि नं ४२/२०२३ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे व मृतदेहाची ओळख पटली असल्याने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती माणगांव पोलिसांनी दिली आहे.

३० ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे माणगांव स्टोन क्र. ३५/२३-३५/२४ च्या दरम्यान दुपारी १.४५ वा. ते २.१५ वा. च्या सुमारास उप ट्रॅकवर नेत्रावती एक्सप्रेस गाडी क्र. १६३४६ ची धडक लागून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनास्थळावर सुरुवातीलाच तरुणीचे बूट (चप्पल) आढळून आली होती. थोड्याच अंतरावर पूर्ण चेहरा विद्रुप झालेला व रेल्वेच्या धडकेने रेल्वे रुळावर पडलेला तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तसेच पोलीसांनी आजूबाजूला शोध घेतला असता पूर्णतः तुटलेल्या अवस्थेत मोबाईल देखील आढळून आला होता. त्यानुसार सदर तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर माणगांव पोलिसांकडून मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!