अमूलकुमार जैन
अलिबाग: पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी हर्षद सुभाष मोकल यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून तीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदरचा गुन्हा हा दि. २८/०१/२०२० ते २०/०३/२०२० चे दरम्यान पेण, ता. पेण, जि. रायगड याठिकाणी घडला असून या प्रकरणातील पिडीत मुलगी हि अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिला फिर्यादी यांचे संमतीशिवाय फुस लावून त्याने पिडीत मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेवून व भावाला जीवे मारण्याची धमकी देवून पिडीत मुलीस जबरदस्तीने त्याचे मित्राचे घरी नेवून तिचे मनाविरुध्द लैंगिक अत्याचार केले. यावर पिडीत मुलीचे आईला सदर बाब कळताच त्यांनी पेण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी याच्याविरुध्द तक्रार नोंदविली.
सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी एकूण १० महत्वाचे साक्षीदार तपासले व कोर्टासमोर भुषण साळवी, विशेष शासकीय अभियोक्त्यांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. सदर केसमध्ये पिडीतेची मैत्रिण फितुर झाली असली तरी तिचा प्रभावीपणे उलट तपास घेवून या प्रकरणातील सत्य न्यायालयासमोर आणले. या प्रकरणातील साक्षीदार पिडीत मुलगी, फिर्यादी, डॉ. ज्योती यादव वैद्यकिय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग तसेच पंच बालाजी गेमा आडे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच पोलीस हवालदार सचिन खैरनार, पैरवी कर्मचारी महिला पोलीस शिपाई प्रियंका नागावकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
आरोपी हर्षद सुभाष मोकल यास १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी दिनांक ३१/०८/२०२३ रोजी महत्वपुर्ण निकाल दिला आहे. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला.
सदर खटल्यात आरोपी हर्षद सुभाष मोकल याच्यावर भा. द. वि. स. कलम ३७६, ५०६, ३४१ तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८ व १० या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. त्यातील आरोपी हर्षद सुभाष मोकल यास भा.द.वि.कलम ३७६ व पोक्सो कायदा २०१२ नुसार कलम ०४, ०६, ०८ व १० प्रमाणे मा. न्यायालयाने दोषी पकडून सदर गुन्हयांकरिता एकत्रित २० वर्षांची शिक्षा व रु. ३०,०००/- रकमेचा दंड अशी शिक्षा ठोठावली असून सदर दंडाच्या रकमेपैकी २५,०००/- पिडीतेला देण्याचा आदेश दिला आहे. तर भा.द.वि. कलम ५०६ अन्वये ०६ महिन्यांची शिक्षा व रु. ५,०००/- दंड ठोठावला आहे. सदर दोन्ही शिक्षा ह्या एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत.