• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी मोफत प्रवासाची भुरळ!

ByEditor

Sep 13, 2023

मतांच्या गोळाबेरजेसाठी नवनवीन फंडे

शशिकांत मोरे
धाटाव :
गणेशोत्सव सणादरम्यान दरवर्षा प्रमाणे यावर्षीही कोकणवासीयांना गाड्यांचे मोफत आरक्षण आणि खासगी बससह परिवहन महामंडळाच्या बसेसने कोकणातील राजकीय पुढाऱ्यांकडून मोफत प्रवासाची भुरळ घालण्याचे सध्या प्रकार सुरू असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही समोर आले आहे. आगामी निवडणुकांचा विचार करून मतांच्या गोळाबेरजेसाठी हे असे नवनवे फंडे जरी सुरू असले तरी हे कोकणवासीयांना मात्र हे अमान्य असल्याचेही दिसून येत आहे.

कोकणात गणेशोत्सव सणाला अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्रामध्ये रोजीरोटीसाठी वास्तव्यास असणारा कोकणवासीय हा आपल्या कुटुंबासमवेत गणेश उत्सवाकरीता कुठल्याही परिस्थितीत अफाट श्रद्धेपोटी गणरायाच्या आगमनासाठी आपल्या घरी, गावाकडे वळतो. कितीही संकटे आली अथवा कर्ज काढावे लागले तरीही कोकणी माणूस हा गणपती सणासाठी कोकणात जातोच.

रेल्वे प्रशासनाकडून गणपती सणासाठी विशेष गाड्या सोडण्यात येत असताना या गाड्यांचे मोफत आरक्षण आणि खासगी बससह परिवहन महामंडळाच्या बसेसने कोकणातील राजकीय पुढाऱ्यांकडून मोफत प्रवासाची भुरळ घालण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. बहुतांशी कोकणवासीय हे मुंबईसह इतर ठिकाणी वास्तव्यास आहेत. याच कोकणवासियांच्या जीवावर बहुतांशी राजकारणी मंडळी सोबत राहून सोयीचे राजकारण करतात. निवडणुका जवळ आल्या की वेगवेगळी प्रलोभने दाखवून मतांची गोळाबेरीज राजकारणी मंडळी सातत्याने करीत असतात. हे काही नवीन नाही. सध्या गणेशोत्सव सणाकरिता कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांना राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोफत प्रवासासाठी भुरळ घातली जात आहे. मोफत प्रवासाचे प्रलोभन दाखवून बुकिंगसाठीचे अर्ज वाटप केले जात असून हेच अर्ज ठराविक अंतिम तारीख देऊन जमा करण्याचे आवाहन केले जात असल्याचेही दिसून येत आहे.

दरम्यान, १४ वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कासवगतीने सुरू असलेल्या कामाकडे पहायला या राजकीय मंडळींना वेळ नाही. कोकणात जाण्यासाठी हक्काचा असलेला हा रस्ता अक्षरशः खड्डेमय होऊन बसला आहे. या रस्त्याचे संपूर्ण काम झाले असते तर कोकणवासीयांना कमी वेळात गावाकडे जाता आले असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विघ्न येत असून प्रवास उशिरा होत असल्याने याच राजकारणी मंडळींच्या बाबतीत काहीजण मात्र बोटं मोडताना दिसत आहेत.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांचा विचार करून कोकणवासीयांच्या मतांसाठी गणपती सणाकरीता मोफत बस,रेल्वे उपलब्ध करून देण्याची वेळ राजकारणी मंडळींवर का येते? याचे आत्मपरीक्षण करण्याची आता खऱ्या अर्थाने गरज असल्याचे काही सुज्ञ मंडळी बोलताना दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!