• Sun. Feb 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शेतकरी, मच्छिमारांचे नुकसान भरपाईसाठी साखळी उपोषण

ByEditor

Sep 15, 2023

वैशाली कडू
उरण :
ओएनजीसी प्रकल्पातून तेलगळती नंतर शेतकरी, मच्छीमार, नागरिक आणि ओएनजीसी प्रशासनाशी नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करण्यासाठी काल गुरुवारी (१४) बैठक बोलाविण्यात आली होती. सदर बैठक अचानक रद्द करण्यात आल्याने संतप्त बाधितांनी ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध करू साखळी उपोषण सुरू केले आहे.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातुन शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळेस तेलगळती झाली होती. या तेलगळतीमुळे शेतकरी, मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी, मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी तहसिलदारांनी पंचनामेही केले आहेत. त्यानंतर या नुकसान संदर्भात चर्चा करण्यासाठी ओएनजीसी प्रशासनाबरोबर गुरुवारी (१४) रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अचानक गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली असल्याचा निरोप तहसीलदारांनी पाठविला. त्यामुळे शेतकरी व मच्छीमार यांनी संतप्त होऊन फसवणूक करीत असल्याचा भावना नुकसानग्रस्तांमध्ये पसरली आहे. त्यामुळेच गुरुवारी ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच जमलेल्या आणि संतप्त झालेल्या नुकसानग्रस्तांनी पीरवाडी मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध करीत साखळी उपोषण सुरू केले असल्याची माहिती समितीचे नेते काका पाटील यांनी दिली.

या साखळी उपोषणात उरण पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. सागर कडू, वैभव कडू, जनाधर थळी, संतोष कडू, स्वप्निल घरत, आशिष काठे, भुपेश कडू आणि महिलांही सहभागी झालेल्या आहेत. दरम्यान अचानक काम निघाल्याने तहसीलदारांनी बोलविलेली बैठक रद्द करून लवकरच घेण्याचे आश्वासन पुन्हा एकदा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिले. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जोपर्यंत बैठक बोलावून न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!