घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील जासई परिसरातील ३७ शेतकऱ्यांची जमीन उरण-नेरुळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र संपादित शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षांपासून साडेबारा टक्के देण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याच्या निषेधार्थ बाधित शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सिडको प्रशासनाला १ महिन्यात साडेबारा टक्के भूखंड दिले नाहीतर रेल्वेचे काम बंद करण्याचा आल्टीमेट जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत यांनी दिला.
गेली २२ वर्षांपासून साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने जासई मधील शेतकऱ्यांनी गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद केले होते. यामुळे रेल्वेचे काम रखडले आहेत. रेल्वे लवकरात लवकर सुरू करावयाची असल्याने या मार्गाच्या कामाने वेग धरला आहे. या संदर्भात जासई मधील शेतकऱ्यांना सिडकोकडून वारंवार झालेल्या बैठकीतून पोलीस यंत्रणा व विविध आस्थापना समोर आश्वासने देऊनही त्याची पूर्तता झालेली नाही. आमच्या जागेवर प्रकल्प सुरु करूनही आमच्या हक्काची जमीम मिळत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

गेली २२ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून ही सिडकोने प्रकल्पग्रस्तांची घोर फसवणूक केली असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांननी पत्रकार परिषदेत केला. आमचा प्रकल्पग्रस्ताला विरोध नाही, परंतु आमचा हक्क आम्हांला मिळालाच पाहिजे. याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. सिडको प्रशासन सांगते आमच्याकडे तुम्हांला जागा देण्यास नसल्याचे सांगतात, मग साडेबावीस टक्के देण्यास जागा कशी आहे, असा सवालही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. आमच्या हक्काचे साडेबारा टक्के भूखंड येत्या महिन्याभरात न दिल्यास रेल्वे आणि सिडको विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल अशी माहिती जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी पत्रकार परिषदेतून दिली. तरीही उरण रेल्वेचे उद्घाटन हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही प्रकल्पग्रस्त काळे झेंडे दाखवून निषेध करू असे शेकापचे युवा नेते रमाकांत म्हात्रे यांनी तर एक महिन्यात प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाहीतर आंदोलन उग्र करण्याचा इशारा बाधित शेतकरी महादेव पाटील यांनी दिला.
यावेळी उपस्थित शेतकरी सरपंच संतोष घरत, कामगार नेते सुरेश पाटील, हरीभाऊ म्हात्रे, महादेव पाटील, रमाकांत म्हात्रे, गणेश पाटील, प्रितेश पाटीl, बबन पाटील, सुरेश पाटील,माणिक घरत,आत्माराम पाटील, नंदकुमार पाटील, मंजुळा तांडेल, अपर्णा ठाकुर, हरी पाटील, हरीशचद्र पाटील, लीलाधर घरत, सचिन पाटील, मोतीराम ठाकूर, एकनाथ घरत आणि इतर सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
