• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ओएनजीसी प्रकल्पबाधित शेतकरी व मच्छिमार नुकसान भरपाईपासून वंचित

ByEditor

Sep 21, 2023

12 दिवस उलटूनही न्याय नाही; साखळी उपोषण सुरूच
न्याय न मिळाल्यास वैभव कडू करणार बेमुदत उपोषण

विठ्ठल ममताबादे
उरण :
दि. 08/09/2023 रोजी सकाळी ओएनजीसी प्रकल्प उरण येथून मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली होती. सदर तेल गळतीमुळे नागांव, केगाव, दांडा, खारखंड व करंजा या गावाजवळील क्षेत्रात मच्छिमार व शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झाले होते. सदर नुकसानीची आर्थिक मदत मिळणे व ओएनजीसी प्रकल्पामधून होणाऱ्या तेल गळतीबाबत उपाययोजना करणे कामी आढावा बैठक घेण्याची व नुकसान भरपाईची मागणी ग्रामस्थ नागाव, केगाव, दांडा, खारखंड व करंजा या गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाकडे केली होती. त्यामुळे ओएनजीसी प्रकल्पामधून होणाऱ्या तसेच गळती, नुकसान भरपाई व विविध मुद्द्यांबाबत चर्चा व उपाययोजना करणेबाबत तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, उरण उद्धव कदम यांचे अध्यक्षतेखाली दि. 18/9/2023 रोजी दुपारी 12:30 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांनी आपली व्यथा, समस्या तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे मांडली व नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी केली. या बैठकीत तहसीलदार उद्धव कदम यांनी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची बाजू ऐकून आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे सांगितले. मात्र नुकसान भरपाई संदर्भात ठोस असे आश्वासन व कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतापले व त्यांनी सुरु केलेले साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीपासून शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची बाजू घेऊन शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेले वैभव कडू यांनी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी वेळोवेळी आवाज उठविला. शासनाच्या प्रत्येक विभागात पत्रव्यवहार केला. मात्र, नुकसान भरपाई मिळाली नाही. तहसील कार्यालयात सुद्धा मिटिंग झाली. त्यातही नुकसान भरपाई संदर्भात योग्य ते निर्णय झाले नाही. आणि जे निर्णय झाले ते प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांना मान्य नाहीत. त्यामुळे ओएनजीसी बाधित शेतकरी, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर ओएनजीसी प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी ओएनजीसी प्रशासनाला दिला आहे.

दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 3 वाजल्यापासून उरण तालुक्यातील पिरवाड समुद्र किनारी असलेल्या ओएनजीसी कंपनीतून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑईल (घातक रसायन) सोडण्यात आले. या केमिकल युक्त तेलाने कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. शिवाय हे तेल नाल्यावाटे शेतात व समुद्रात पसरले. त्यामूळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे व मच्छीमार बांधवाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना समजताच नागाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदर बाब त्यांनी शासकीय अधिकारी व ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. उरणचे तहसिलदार उद्धव कदम, मंडळ अधिकारी अनिल पाटील,पोलीस अधिकारी एपीआय होलगे, ओएनजीसी प्रशासनाचे ऑपरेशन हेड एस. के. त्रिवेदी, जनरल मॅनेजर आर. के. सिन्हा यांनी घटनेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान घटनास्थळी मांगीण देवी मंदिरात महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी, मच्छीमार व ग्रामस्थांनी आपली व्यथा त्यांच्या समोर मांडली. त्यावेळी तहसीलदार उद्धव कदम यांनी तहसील कार्यालय, ओएनजीसी प्रशासन व बाधित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, शेतकरी यांची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे 18 सप्टेंबर 2023 रोजी उरण तहसील कार्यालयात मिटिंग सुद्धा झाली. मात्र या मिटिंगमध्ये काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त, शेतकरी संतप्त झाले आहेत.

कायदेशीर व शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार करून, बैठकघेऊन न्याय मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते वैभव कडु यांनीही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास वैभव कडू, शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या सर्व घडामोडीवर व या बाधित शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्या भूमिकेकडे शासन कोणत्या दृष्टीने बघते व हा प्रश्न कसा सोडविते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!