कुणाला कोणता सेलिब्रेटी आवडतो यावरून घराघरांत, मित्रामित्रांत मतभेद असतात, त्यावरून काही वेळा वादही होतात; पण एखाद्या परीक्षेत जर एखाद्या सेलिब्रेटी वा महान व्यक्तीबद्दल प्रश्न असला तर ती व्यक्ती आवडो वा न आवडो, पण गुणांसाठी त्या सेलिब्रेटीबद्दल सर्वच जण चांगलेच लिहितात. याला केरळमधील एक चिमुकली मात्र अपवाद ठरली. चौथीची वार्षिक परीक्षा देणाऱ्या या चिमुरडीने जगप्रसिद्ध आणि विश्वविजेता फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीबद्दल (Lionel Messi) आपल्याला काय वाटते हे रोखठोकपणे उत्तरात लिहूनच टाकले. तिचे हे उत्तर चर्चेचा विषय ठरले असून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
फुटबॉलचे दिवाणे असलेल्या लोकांमध्ये मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो हा वाद नेहमीच रंगतो. काही वेळा मेस्सी, रोनाल्डो यांच्या जोडीला नेमार व एमबाप्पे यांचेही नाव वादात रंगते. असेच काहीसे केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील पुदुपल्ली येथील या चिमुकल्या विद्यार्थिनीबाबत झाले. रिझा फातिमा (Riza Fathima of Puduppalli) असे तिचे नाव.
तिच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न होता, विश्वविख्यात फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याचे वर्णन करा. ( “Prepare a biographical note of renowned footballer Lionel Messi).
“चांगल्या पाच मार्कांसाठी हा प्रश्न होता; पण रिझा फातिमा ही काही मेस्सीची प्रशंसक नाही तर ब्राझील आणि नेमारची Neymar and Brazil ती फॅन आहे. त्यामुळे तिला मेस्सीबद्दलच्या ह्या प्रश्नावर काय लिहावे, लिहावे की न लिहावे, न लिहिल्यास ५ गुणांचे नुकसान होईल आणि आपली टक्केवारी घसरेल असे अनेक प्रश्न होते; पण शेवटी तिने आपल्या मनाचे ऐकले आणि उत्तर लिहिले. आणि तिला मनापासून जे वाटते ते तिने लिहिलेले उत्तर अतिशय भन्नाट होते आणि म्हणूनच ते व्हायरल झाले आहे.
विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी मेस्सीच्या कारकिर्दीतील ठळक घटना, त्याचे पालक यांचे मुद्देसुद्धा देण्यात आलेले होते. त्याचा फोटोही होता. त्याआधारे मेस्सीचे वर्णन करायचे होते; पण रिझा फातिमाने ठरवले होते, मेस्सी आवडत नाही तर त्याच्याबद्दल लिहू कशाला? म्हणून तिने लिहिले, ‘मी मेस्सीबद्दल लिहिणार नाही, मी ब्राझीलची समर्थक असून नेमार माझा आवडता खेळाडू आहे. मला मेस्सी आवडत नाही.’ उत्तरासाठी उत्तरपत्रिकेत जागा मोठी असल्याने तिने मल्याळी भाषेत मोठमोठ्या अक्षरात हे उत्तर लिहिले आणि ते चांगलेच व्हायरल झाले.
या अशा उत्तरासाठी तिला गुण मिळणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही; पण आपली ‘मन की बात’ बोलून तिने सर्वांचेच मन जिंकले आहे. तिच्या शिक्षकांनी हे उत्तर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ते चांगलेच व्हायरल झाले आहे. विद्यार्थांनाही आपली मते मांडण्याचा अधिकार आहे, असे आपण मानतो, असे या शिक्षकाने म्हटले आहे.
