• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एशियन गेम्स : महिला क्रिकेटमध्ये भारताला सुवर्ण, एकाच दिवशी दोन सुवर्णपदकांची कमाई

ByEditor

Sep 25, 2023

हांगजोऊ: भारताच्या महिला क्रिकेट टीमनं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. या ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतनं श्रीलंकेला 19 धावांनी हरवलं. चीनच्या हांगझू मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचं हे दिवसातलं दुसरं सुवर्णपदक ठरलं. एशियन गेम्सच्या इतिहासात भारताचं हे क्रिकेटमधलं पहिलंच पदक ठरलं आहे. याआधी 2010 आणि 2014 साली या क्रीडास्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, पण बीसीसीआयनं तेव्हा संघ पाठवला नव्हता. भारताच्या महिला टीमनं याआधी 2022 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम्स) रौप्यपदक मिळवलं होतं. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतानं एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

हांगझूमध्ये भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर स्मृति मंधानाने सर्वाधिक 46 तर जेमिमा रॉड्रिग्सनं 42 धावांची खेळी केली. निर्धारित 20 षटकांत भारतीय महिलांनी सात विकेट्सच्या मोबदल्यात 116 धावा केल्या. तर श्रीलंकेच्या टीमला 20 षटकांत आठ विकेट्समध्ये 97 धावाच करता आल्या. भारताकडून तितास साधूनं तीन, राजेश्वरी गायकवाडनं दोन तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार आणि देविका वैद्यनं प्रत्येकी एक विकेट काढली. या स्पर्धेत श्रीलंकेनं रौप्यपदक मिळवलं. तर बांगलादेशनं पाकिस्तानला हरवून कांस्यपदक पटकावलं.

पहिलं सुवर्णपदक नेमबाजीत

25 सप्टेंबरला सकाळी रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि दिव्यांश पनवर या नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकलं. तिघांनी पात्रता फेरीत 1893.7 गुण मिळवून अव्वल स्थान गाठलंच, शिवाय नव्या जागतिक विक्रमाचीही नोंद केली. चीनचा 1893.3 गुणांचा जागतिक विक्रम भारतानं मोडला आहे. ऐश्वर्यनं त्यानंतर वैयक्तिक कांस्यपदकही मिळवलं. या क्रीडाप्रकारावर भारताचं किती वर्चस्व आहे, याची झलकही या स्पर्धेत पाहायला मिळाली.

पात्रता फेरीत रुद्रांक्षनं 632.8 गुणांसह तिसरं, ऐश्वर्यनं 631.6 गुणांसह पाचवं तर दिव्यांशनं 629.6 गुणांसह आठवं स्थान मिळवलं. पण एका देशाच्या दोनच नेमबाजांना फायनल गाठता येत असल्यानं, दिव्यांशला अंतिम फेरीत वैयक्तिक पदकासाठी खेळता आलं नाही. फायनलमध्ये 20 शॉट्सनंतर रुद्रांक्ष आणि ऐश्वर्य बरोबरीत होते, तेव्हा शूटऑफमध्ये ऐश्वर्यनं त्याला मागे टाकलं. रुद्रांक्षचं आव्हान संपुष्टात आलं. पुढे ऐश्वर्यला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

दुसरीकडे, पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल नेमबाजीत विजयवीर सिद्धू, अनिश आणि आदर्श सिंगच्या भारतीय संघानं 1718 गुणांसह तिसरं स्थान मिळवत कांस्यपदकाची कमाई केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!