मुंबई: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराज असलेले आमदार भरत गोगावले यांनी मंगळवारी पुन्हा एकदा मंत्रिपदाबाबत इच्छा व्यक्त केली. बाप्पाला कळतेय भरतशेठला मंत्री करण्याविषयी. त्यामुळे ते तर लवकरच होईल, असे गोगावले म्हणाले.
राज्यात सत्ताबदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या काही आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले होते. मात्र वर्ष उलटले तरी विस्तार झालेला नाही. त्यानंतर अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र शिंदे यांच्या पक्षातील आमदारांना मंत्रिमंडळात प्रवेश होऊ शकला नाही. साहजिकच यातील अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त करताना विविध वक्तव्येही केली. त्यात संजय शिरसाट आणि भरत गोगावले आघाडीवर आहेत.
गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केले. आमदार अपात्र प्रकरणात आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. आमची बाजू सकारात्मक आहे. अध्यक्ष नियमाप्रमाणे निकाल देतील. काळजी त्यांनी करावी, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाकडे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने साकडे घातले. बाप्पाला कळतेय भरतशेठला मंत्री करण्याविषयी, त्यामुळे ते तर लवकरच होईल. वेळ आली की भरत गोगावले मंत्री होईल, असेही ते म्हणाले.