अमुलकुमार जैन
अलिबाग : अलिबागमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत रेंट बाईक विरोधात अलिबागमधील रिक्षा चालक एकवटले आहेत. शनिवारी दोन दुचाकी पोलीसांच्या ताब्यात देऊन संबंधित व्यवसायिकांविरोधात कारवाई करा अशी मागणी रिक्षा चालकांनी केली.
रेंट बाईक विरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा चालकांनी दंड थोपटले आहेत. पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. या व्यवसायामुळे रिक्षा व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी अलिबाग शहरात पर्यटक रेंट बाईक फिरवत असल्याचे दिसून आले. रिक्षा चालकांनी ती बाईक पोलीसांच्या ताब्यात दिली. दरम्यान, पोलिसांनी रेंट बाईक व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्यावेळी रिक्षा चालक संतापले. त्यांनी लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या दुचाकी जप्त कराव्यात असे सांगितले. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी अलिबाग ऑटो रिक्षा व्यावसायिक संघटनाचे माजी अध्यक्ष शेख पाटील, अध्यक्ष शरद राऊत, अफझल सय्यद, संजय जाधव, संदेश चेवले, मन्सूर आगा आदी पदाधिकार्यांसह रिक्षा चालक उपस्थित होते.
