सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील ढालघर गावातील ३२ वर्षीय तरुणाने दररोज होणाऱ्या घरातील भांडणाच्या नैराश्यातून रस्सीने करंजाच्या झाडाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर गणपत रंगू तेटगुरे (वय ६२) रा. ढालघर ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत विठोबा गणपत तेटगुरे (वय ३२) रा. ढालघर याने पत्नी व आईच्या रोजच्या भांडणाला कंटाळून नैराश्यामध्ये बैल बांधणीसाठी वापरले जाणाऱ्या दावणीच्या रस्सीने घराच्या पाठीमागील करंजाच्या झाडाला गळफास घेतल्याने त्यास उपचाराकरिता रुग्णवाहिकेमधून माणगाव येथील उपजिल्हारुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. ६१/ २०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष अस्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क फौजदार निमकर हे करीत आहेत.
