मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार
अनंत नारंगीकर
उरण : जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रविवारी (दि. १०) रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी राजणपाडा गावात धुमाकूळ घातल्याने रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजणपाडा गावातील आहिल्याबाई महादेव म्हात्रे हि महिला आपले घर बंद करून बाजूच्या घरात नेहमीप्रमाणे झोपायला गेली होती. तर प्रभाकर तुकाराम पाटील हे रात्र पाळीसाठी कामावर गेले होते, तसेच नामदेव आलू घरत, सुहास म्हात्रे हे रहिवाशी रविवारी (दि. १०) आपआपल्या घरी रात्रीच्या सुमारास झोपी गेले होते. याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन एकाच रात्री चार बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा कटरनी तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटाचे लॉक तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच राजणपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे यांनी उरण पोलीसांना झालेल्या घटनेची माहिती दिली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून तात्काळ घडलेल्या घरफोडीचे पंचनामे सुरू केले आहेत. सदर चोरटे हे गावातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने लवकरात लवकर चोरटे जेरबंद केले जातील असे आश्वासन पोलीसांनी रहिवाशांना दिले आहे. मात्र, या अगोदरही राजणपाडा गावातील श्री हनुमान मंदीरात चोरीची घटना घडली होती. त्या चोरीचा तपास आजतागायत न लागल्याने सध्या रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.