मिलिंद माने
महाड : शहरामध्ये गांधारी पुलाजवळ दोन गटात पैशाच्या वादातून तुफान हाणामारी झाली. या वादात तीन आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून एक चोरीचा गुन्हा तर एक झटापटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अय्याज युसूफ चिपळूणकर रा. महाड पानसारी मोहल्ला यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ताबीश जासुद्दीन चरफरे रा. वहूर यांचा आणि त्यांच्या बहिणीच्या पतीचा पैशाचा आर्थिक व्यवहार झाली. याची परतफेड न झाल्याने त्यांनी ताबीश यांना आपला जेसीबी वापरण्याकरिता दिला होता. मात्र बहिणीने चावी देत जेसीबी मशीन परत आणण्यास सांगितले. त्यानुसार जेसीबी मशीन परत घेऊन आल्यानंतर महाड शहर हद्दीत गांधारी पुलाजवळ क्रिकेट ग्राउंड वरती सुफयान शौकत ईसाने आणि ताबीश जासुद्दीन चरफरे दोघे राहणार वहूर यांनी मंगळवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना जेसीबी बद्दल जाब विचारून मारहाण करत चाकूने वार केला. तर सुफयान शौकत ईसाने यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या ताब्यातील पिवळ्या रंगाचा जेसीबी अंदाजे किंमत २० लाख रुपये हा आरोपी अय्याज युसूफ चिपळूणकर यांनी त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेला. फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपी हे रागात येऊन गाडीतून तलवार काढत फिर्यादी आणि साक्षीदार यांना हाताबुक्क्याने मारहाण केली.
महाड शहर पुन्हा पोलीस ठाण्या समोर १० ते १५ लोकांचा जमाव जमवून मारहाण केली. महाड शहर पोलीस ठाण्यात दोन्ही परस्पर दाखल झालेल्या फिर्यादी नुसार तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.