झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड संघ विजयी
क्रीडा प्रतिनिधी
पोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघानी करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघावर विजय मिळवला.

नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघाने धुवाँधार फलंदाजी केली. सलामीवीर अष्टपैलू खेळाडू आरुष कोल्हे यांनी चौफेर टोलेबाजी करत शतक ठोकले. १०८ चेंडूंचा सामना करत १७ चौकार आणि ९ षटकार ठोकत १६० धावा काढल्या. दुसऱ्या बाजूने रोशनी पारधी हिने आरुषला साथ देत ६१ धावांचे योगदान दिले. दोघांनी २१९ धावांची भागीदारी केली. अमर बी. के. यानी मधल्या फळीत ५० धावा काढल्या. ४० षटकांच्या समाप्तीनंतर महाड संघाने ३२१ धावांचे लक्ष ठेवले. कामोठे संघाकडून पियुष दांडेकर याने २, कल्पित कोळी याने १ फलंदाज बाद केला.
प्रतिउत्तर देताना करण क्रिकेट अकॅडमी संघांनी २९ षटकांमध्ये सर्व गडी गमावत ११० धावाच केल्या. वेंदांत शिंदेने १६ धावा काढल्या. महाड संघाकडून शिवा कुशवाह याने ३, प्रचिती जाधव व अश्वत तेगवान यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. शतकवीर अष्टपैलू खेळाडू आरुष कोल्हे याला सामनावीर, पियुष दांडेकर स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, इमार्जिंग प्लेअर प्रचिती जाधव, अमर बी. के, आयुष शिर्के, वेदांत शिंदे, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून आर्यन पांडे, अल्तामाश खान यांना झुंझारचे सचिव किशोर तावडे पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सदस्य अशोक जैन, योगेश तावडे, संदिप जोशी, करण कांबळे, आवेश चीचकर, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.