गणेश पवार
कर्जत : कर्जत तालुका रविवार, दि. २४ रोजी खुनाच्या घटनेने हादरला होता. तर स्थानिक परिस्थितीनुसार या हत्याकांडाचा उलगडा होणे देखील गरजेचे होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकरणाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर ६ तासात या हत्याकांडाचा उलगडा गुन्हे अन्वेषण शाखेने लावत गावातील ३ आरोपींना जेरबंद केले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सगळीकडे सुट्ट्यांची धामधूम सुरु असताना रविवार, दि. २४ रोजी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे खुनाची घटना घडली असल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. मोठे वेणगाव येथील कुणाल अरूण आंब्रे (वय-२२) याचा मृतदेह येथील नाल्यामध्ये आढळून आला होता. तर ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचत त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. याचसोबत सकाळी १०.४५च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना माहीती प्राप्त झाली की, कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मोठे वेणगाव या ठिकाणी एका इसमांचा खुन झालेला आहे. या खुनाबाबत माहीती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार यांची वेगवेगळी दोन पथके तयार करून घटनास्थळी भेट दिली.
मयत कुणाल याची ओळख पटलेली होती. त्यांनतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यांचा शोध सुरू केला. गोपनीय माहीती काढून आरोपी यांची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यामध्ये गणेश मधुकर पालकर, राकेश पांडूरंग चौधरी व प्रल्हाद प्रविण सावंत (रा. मोठे वेणगाव) यांचे मोबाईल नंबर व फोटो प्राप्त करून तांत्रीक तपास करत शोध घेण्यात आला. तांत्रीक तपासावरून आरोपी हे कर्जत येथुन पनवेल बाजुस जात असल्याचे समजले. तेव्हा तात्काळ त्यांच्या मार्गावर पथकाने नाकाबंदी करत वाहनांची तपासणी सुरु केली. त्यावेळी पांढऱ्या रंगाची महिंद्रा गाडी क्र.एमएच ४६ एल ०५६७ मधुन आरोपी जात असल्याचे दिसुन आले. त्यावेळी सदर आरोपी यांना वाहन थांबवण्याचा इशारा केला असता ते न थांबता पळुन जावू लागले. त्यावेळी सदर वाहनाचा पथकाने पाठलाग करून गाडी आडवुन आरोपीत यांस शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. ३१८/२०२३ भादवि.सं.कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक स्था.गु.अ. शाखा रायगड बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, सहाय्य्क फौजदार प्रसाद पाटील, राजेश पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे, यशवंत झेमसे, संदीप पाटील, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रूपेश निगडे, स्वामी गावंड, अक्षय सावंत, अक्षय जगताप, सायबर सेल कडील पोलीस नाईक तुषार घरत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.