कारवाईबाबत पालिका प्रशासन उदासीन
मिलिंद माने
महाड : शहरातील ऐतिहासिक चवदारतळ्याच्या काठावर होत असलेली अवजड आणि छोट्या वाहनांची पार्किंग दूर करण्यास पालिका आणि पोलीस प्रशासनात तू तू – मै मै ची भूमिका आजही सुरूच आहे. हा परिसर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नो पार्किंग झोन जाहीर होऊन देखील वाहने पार्किंग केली जात आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि शैक्षणिक सहलींमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायी चालताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न सोडवण्याबाबत नगरपरिषद प्रशासन आणि महाड शहर पोलीस प्रशासन उदासीन असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २७ मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. राज्य शासनाने या चवदार तळ्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन उचित सन्मान केला आहे. महाडचे तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांच्या अथक प्रयत्नातून चवदार तळ्याचा महत्त्वपूर्ण सौंदर्यीकरणाचा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. महाड मधील ऐतिहासिक चवदार तळे सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ १४ एप्रिल १९८९ करण्यात आल्यानंतर २ जून १९९२ रोजी काम पूर्ण झाले. स्वर्गीय अण्णासाहेब सावंत यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मूर्त स्वरूप देत असताना एक वेगळा उद्देश समोर ठेवला होता. ज्या चवदार तळ्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा लढा दिला, समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळवून दिला त्या ऐतिहासिक तळ्याच्या परिसराची योग्य प्रकारे देखरेख करणे, त्याचे पावित्र्य राखणे, त्याची निगराणी करणे हे काम पालिका प्रशासनाकडे आहे. परंतु त्याकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या तळ्याच्या सभोवतालचा परिसर वाहनतळ झाला असल्याने मूळ उद्देशच बाजूला ठेवण्यात आला आहे. पूर्वेकडील बाजूस तळ्याच्या भिंतीलगत कचऱ्याचे, मातीचे, दगड विटांनी भरलेल्या पिशव्यांचे ढीग आहेत. त्याच्या सफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे आहे. याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महाडकर नागरिक करीत आहेत.
महाडमधील ऐतिहासिक चवदारतळ्यावर विविध कार्यक्रमांना लाखो भीमसैनिक भेट देत असतात. तमाम भीमसैनिक आणि भीम अनुयायांचे चवदार तळे हे श्रद्धास्थान आहे. यामुळे चवदारतळे स्मृतिदिनाला देखील याठिकाणी लाखो भीमसैनिक येत असतात. चवदार तळ्याच्या उजव्या बाजूस असलेल्या भिंतीजवळ गेली अनेक वर्ष अवजड वाहनांची पार्किंग होत आहे. या पार्किंगमुळे येणाऱ्या पर्यटकांना आणि भीमसैनिकांना त्यांची वाहने पार्क करणे अवघड होऊन बसते.
चवदार तळ्याची भिंत खचण्याचा धोका?
ऐतिहासिक चवदार तळ्यावर कायमस्वरूपी अवजड वाहनांचा गराडा या चवदार तळ्याच्या बाजूने पडल्याने चवदार तळ्याची संरक्षक भिंत खचण्याचा धोका निर्माण झाला आहे मात्र याकडे नगरपरिषद प्रशासन व महाड शहर पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ही संरक्षण भिंत कधीही खचू शकते अशी चर्चा या परिसरातील नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे ऐतिहासिक चवदार तळ्यावरील अवजड वाहनांमुळे संरक्षक भिंतीस होणारा संभाव्य धोका आणि अडचण लक्षात घेवून महाड नगरपालिकेने हा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून जाहीर व्हावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव देखील जवळपास तीन वर्षांनी मंजूर झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी आजही होत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्किंग मध्ये गेली अनेक महिने कांही वाहने जागीच उभी आहेत. वाहनांवरील साचलेली धूळ आणि शेजारी साचलेला कचरा यावरून या डेड पार्किंगच्या कालावधीचा अंदाज बांधता येणार आहे. या डेड पार्किंग मुळे शैक्षणिक सहलीला आलेल्या वाहनांना पार्किंग करता येणे अशक्य झाले आहे.
चवदार तळ्याच्या शेजारी असलेल्या भिंत आणि पदपथाशेजारीच ट्रक, कार, अशी वाहने गेली अनेक वर्ष पार्क केली जात आहेत. याठिकाणी महाड नगर पालिकेने नो पार्किंग चे फलक देखील लावले आहेत. हे फलक मधल्या काळात कांहीनी काढून टाकले, मात्र आता पुन्हा नव्याने फलक लावले असले तरी पार्किंग केली जात आहे. चवदार तळे पाहण्यासाठी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणात दाखल होतात. यातील एस.टी.बसेस आधीच पार्क असलेल्या वाहनांमुळे उभ्या करणे शक्य होत नाही यामुळे एस.टी.बसेस बाहेर उभ्या केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना चालत ये जा करावी लागत आहे.
ऐतिहासिक चवदार तळे परिसरात कायम वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पर्यटकांना देखील आपली वाहने पार्क करणे आणि सहलींच्या मोठ्या वाहनांना या अवजड वाहन पार्किंगचा मोठा त्रास होतो. मात्र याबाबत पालिका आणि पोलीस प्रशासन कांहीच कारवाई करत नाही. चवदार तळे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता रायगड जिल्हाधिकारी यांनी चौपदरीकरण करण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया अनेक भीमसैनिकांनी व सहलीसाठी येणाऱ्या अनेक महाविद्यालयीन शिक्षकांनी बोलून दाखवली वाहतूक कोंडीचा फटका मात्र चवदार तळे पाहण्यास येणाऱ्या सहलींना बसत आहे.
शैक्षणिक सहलींच्या बसेस याठिकाणी पार्क केल्यास वाहतूक कोंडी होते. येथील पार्किंग हटवल्यास याठिकाणी या बसेस पार्क करणे शक्य होणार आहे. महाड शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारची डेड पार्किंग ठिकठिकाणी दिसून येत आहे. रस्त्यालगत गेली अनेक वर्ष या गाड्या तशाच पडून आहेत मात्र, हि वाहने बाजूला काढण्याचे काम संबंधित वाहन चालकाचे मालक तर करीतच नाहीत परंतु पोलीस मात्र बघायची भूमिका घेत असल्याने महाड शहरातील एकही ठिकाण असे नाही की जिथे वाहतूक कोंडी झाली नाही ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तिथे वाहतूक पोलीस कधीच हजर नसतात ते नेहमी या वाहतूक कोंडी पासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने महाड मधील जनता महाड नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करीत आहे महाड शहराला वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी या वाहतूक कोंडीला जबाबदार असणाऱ्या बँका पतपेढ्या हॉटेल मालक व दुकानाचे मूळ गाळे सोडून रस्त्यावर येऊन व्यवसाय करणाऱ्या गाळे मालकांवर नगरपरिषद काय भूमिका घेते यावर सर्व काही अवलंबून आहे