न्हावा-शिवडी सी लिंकवर कोणत्याही प्रकारचे वाहन थांबवू नये -जी. एम. मुजावर
अनंत नारंगीकर
उरण : न्हावा-शिवडी सी लिंक (अटल सेतू) वर शासनाच्या,पोलीस यंत्रणेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करता काही वाहन चालक आपली वाहने थांबवून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होणार असल्याने कायद्याचे पालन न करणाऱ्या अशा वाहनांवर नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाईचे सत्र सुरू केले आहे. तरी न्हावा-शिवडी सी लिंकवर कोणत्याही प्रकारची वाहने थांबवू नयेत असे आवाहन न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी केले आहे.

न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी माहिती देताना सांगितले की, न्हावा-शिवडी सी-लिंक (अटल सेतू)चे उद्घाटन नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून, सदर पुलावर दुचाकी व तीन चाकी वाहनास प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच सदर सेतूवर चारचाकी वाहनाकरिता वेग मर्यादा १०० किलोमीटर प्रति तास इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच सदर पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास व वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना देखील पोलीसांच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक वाहन चालक आपली वाहने अटल सेतूवर पार्क करून वाहनातून खाली उतरून सेल्फी काढण्यात तसेच फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत. सदर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. वाहन चालकांचे बेशिस्त वर्तणुकीस आळा घालण्याकरिता न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वतीने विनाकारण अटल सेतूवर वाहने पार्क केलेल्या व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या एकूण १४४ वाहन चालकांविरुद्ध कलम १२२/१७७ मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी रु. ५०० ते १५०० इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अटल सेतू वर विनाकारण थांबलेल्या लोकांना हटविण्यासाठी दोन गस्ती पथके नेमण्यात आली असून जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्या व्यक्तीवर व वाहन चालकाविरुद्ध यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तरी न्हावा-शिवडी सी-लिंक (अटल सेतू) वरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना विनंती करण्यात येते की सदर सेतू वरून प्रवास करताना विनाकारण त्यांचे वाहन अटल सेतूवर पार्क करू नये व रहदारीच्या वाहनांना अडथळा होईल असे वर्तन करू नये, अन्यथा त्यांचे विरुद्ध आणखी कठोर दंडात्मक कारवाई नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी सांगितले आहे.