विविध घरांमधून शिवसेना महिला पथकाला मोठा प्रतिसाद
प्रतिनिधी
ठाणे : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाची प्रेरणा घेवून कल्याण शहर परिसरात घरोघरी जावून शिवसेनेचे विचार आणि शिवसेनेने केलेल्या कामाची माहिती तसेच महिलांचे सशक्तीकरण करण्याबाबत कल्याण शिवसेना महिला आघाडीच्या कल्पना उर्फ राणी कपोते यांनी पुढाकार घेतला असून विविध घरातून तथा परिवारांमधून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
वरळी येथे झालेल्या अधिवेशनानंतर शिवसेनेची कामे घराघरात पोहचवा असे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर राणी कपोते यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या पथकाने घरोघरी फिरण्यास सुरुवात केली आहे. विविध घरांमध्ये त्यांचे स्वागत होत आहे. कोविड काळात उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामांची प्रशंसा घराघरातून व्यक्त केली जात आहे. कोविड काळातील अनेक अनुभव विविध नागरीकांनी विशेषत: महिलांनी कथन केल्याचे राणी कपोते यांनी सांगितले.
सध्याची महागाई, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, गॅस सिलेंडर, अन्न-वस्त्र-निवारा आदींबाबतही सामान्य नागरीकांच्या भावना तीव्र आहे. शिवसेनेनी केलेली कामे सांगतांनाच महागाई बद्दल नागरीक विविध तव्रâारीं या महिलांच्या पथकाकडे करीत आहेत. महाराष्ट्राचा विकास करण्याबाबत उध्दव ठाकरे यांची भूमिका हे महिलांचे पथक सविस्तरपणे समजावून सांगत आहेत. उध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांची शिवसेना लोकतंत्र वाचविण्यासाठी करीत असलेली धडपड तसेच सामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चे, आंदोलने, राज्यव्यापी शिबीरे आयोजित करुन नागरीकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे या महिला घरोघरी जावून सामान्य नागरीकांना सांगत आहेत.
शिवसेना महिला आघाडीचा हा उपक्रम कल्पना उर्फ राणी कपोते यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी महिला कोमल कागुणे, माया देवकाते, सविता सोहनी, प्रियांका दर्डे, नंदा गावठे, रंजना माने, छाया जाधव आदी महिला सहभागी झाल्या आहेत. या अभिनव उपक्रमाचे घराघरांमधून स्वागत होत आहे.