अलिबाग : दि. ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व जागतिक कुष्ठरोग निवारण दिन यांचे औचित्य साधून “स्पर्श, कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड-अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान, जीतनगर, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने “कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा परिषद, अलिबाग इमारतीसमोरुन ५ किलोमीटर अंतरामध्ये अलिबाग शहरांत करण्यात आले होते.
डॉ. प्रताप शिंदे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रायगड अलिबाग यांनी सकाळी ७ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित स्पर्धकांना व नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती देवून मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेत अलिबाग शहरांतील असंख्य विद्यार्थी-विद्यार्थीनी, पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, माणुसकी प्रतिष्ठान संस्थेतील सदस्य, तेजस्विनी फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा, इतर शासकीय कर्मचारी शहरांतील सामान्य नागरिक सहभागी झाले होते.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक
प्रथम क्रमांक :- कु. संदिप रामचंद्र पाल
द्वितीय क्रमांकः- कु. रोशन परशुराम पाटील
तृतीय क्रमांकः कु. रामू गणपत पारधी
सदर स्पर्धेतील विजेत्यांना सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रायगड-अलिबाग डॉ. प्रताप शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुप्रिया वेटकोळी, व माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफी प्रदान करण्यात आले. तसेच पारितोषिकाची रक्कम (प्रथम क्रमांक :-८,०००/-, द्वितीय क्रमांक :-५,०००/- व तृतीय क्रमांक:- ३,०००/-) स्पर्धकांच्या बँक खात्यावर पीएफएमएस द्वारा जमा करण्यात येईल. सदर मॅरेथॉन स्पर्धेतील उत्स्फुर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थीनीतील प्रथम ५ विजेत्या विद्यार्थीनींना तेजस्विनी फाउंडेशनकडून मेडल व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना माणुसकी प्रतिष्ठानकडून प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग, सुरभी स्वयंसेवी संस्था, तेजस्विनी फाऊंडेशन, लायन्स क्लब श्रीबाग, अलिबाग, रायगड पोलिस दल अलिबाग, पत्रकार वर्ग, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन, विश्व स्पर्धा अकॅडमी अलिबाग, निवृत्त शिक्षक वर्ग या सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा माहिती व विस्तार अधिकारी राजेंद्र भिसे, कुष्ठरोग तंत्रज्ञ भगवान जाधव, पर्यवेक्षक तेजस मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जीविता पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी विजेत्या स्पर्धकांचे, सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन व सर्व सहभागी संस्थेतील पदाधिकारी, शाळा कॉलेज शिक्षक वर्ग यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.