मिलिंद माने
महाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथूर्डे धरणातील पाईपलाईन चापगावजवळ फुटल्याने महाड शहरात गेली दोन दिवस पिण्याचे पाणीच आले नाही. यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. चापगाव येथे ग्रामपंचायतमार्फत काम सुरु असताना जेसीबी यंत्रामुळे ही पाईपलाईन फुटली गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चापगावजवळ दि. 30 जानेवारी रोजी गावातील पाणीपुरवठा योजनेतील विहिरीचे काम सुरू असताना जेसीबी यंत्राने पाईपलाईन फुटली गेली. यामुळे हजारो लिटर पाणी देखील वाया गेले. पाईपलाईन फुटल्यामुळे महाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ धाव घेऊन कोथूर्डे धरणातील पाणीपुरवठा बंद केला. यामुळे गेली दोन दिवस महाड परिसरात पाणी आलेले नाही. याबाबत महाड नगरपालिकेने झालेल्या गैरसोयीबाबत नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
चापगाव गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना जेसीबीमुळे ही पाईपलाईन फुटली गेली. यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत करून देण्याची जबाबदारी देखील सदर ग्रामपंचायतीने घेतली असल्याचे महाड मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळपर्यंत पाईपलाईनचे काम केले जाऊन पाणीपुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर यांनी दिली.