शशिकांत मोरे
धाटाव : आखिल भारतीय मराठा महासंघाचा प्रसार आणि प्रचार रायगड जिल्ह्यात तालुक्यातील गावागावात व्हावा याच उदात्त हेतूने जिल्हाध्यक्षा स्नेहाताई आंबरे यांनी रोह्यातील आखिल भारतीय मराठा महासंघाच्या हळदी कुंकू कार्यक्रमात धाटाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया पाशिलकर यांची महिला तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती केली आहे. याप्रसंगी असंख्य महिलांच्या उपस्थितीत पाशिलकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सुप्रिया पाशिलकर या मूळ धाटाव येथील रहिवासी असून त्यांना सामाजिक, शैक्षणिक कार्याची आवड असल्याने त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्याची दखल म्हणून कोल्हापूर येथे वसुंधरा सामाजिक संस्थेच्यावतीने त्यांना सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पातळीवर महिला दिनी त्यांना ग्रामपंचायत स्तरावर अहिल्याबाई होळकर सन्मान दिला गेला आहे. तर महिलांसाठी विविध बँकांच्या योजना आणि माहिती दिल्याबद्दल सुराज्य सामाजिक संस्थेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सध्या आरबीआयच्या माध्यमातून क्रीसिल फाऊंडेशनमध्ये त्या असिस्टंट एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कामाची आवड आणि पद्धत पाहून त्यांना आखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
समाजाच्या प्रसार आणि प्रचाराबरोबर सध्या मी ज्या क्षेत्रात काम पहात आहे त्याच माध्यमातून मराठा समाजातील महिला वर्ग यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून महिलांसाठी हातात हात घालून सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचे सुप्रिया पाशिलकर यांनी उपस्थितांसमोर सांगितले.