मिलिंद माने
महाड : पत्नीच्या अनैतिक संबंधाची खबर पतीला लागताच त्याने पत्नीशी संगनमत करून संबंधित इसमास घरी बोलावून जबर मारहाण केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पति-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे जोडपे परप्रांतीय असून ज्यास मारहाण करण्यात आली तो देखील परप्रांतीयच आहे. ही घटना सोमवार ४ मार्च २०२४ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास आसनपोई गावात घडली.
महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड औद्योगिक वसाहतीमधील आसनपोई गावात महेश गंगाप्रसाद कोल आणि त्याची पत्नी दोघेही (मूळ राहणार मध्यप्रदेश) हे एका घरात भाड्याने राहतात. महेश यांच्या पत्नीचे लाले रामगोपाल रावत (मूळ मध्यप्रदेश, सध्या राहणार शेलटोली महाड) याचेसोबत एक वर्षापासून अनैतिक संबंध होते आणि याची खबर पती महेश यास लागताच राग मनात धरून त्याने आपल्या पत्नीशी संगनमत करून सोमवार, दि. ४ मार्च २०२४ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास लाले यास घरी बोलवून जबर मारहाण केली. याबाबत लाले याने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पती-पत्नी विरोधात रीतसर तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती-पत्नी विरोधात भा.द.वि. कलम ३२४/५०४/३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.