मिलिंद माने
महाड : महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 66 वर गुजरात ते चिपळूण एमआयडीसीमध्ये हायड्रो क्लोरिक ऍसिडचे २४ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधील एका सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने परिसरात धूर पसरून या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना या गॅसचा त्रास सहन करावा लागल्याची घटना आज सकाळी घडली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या जीजे १७ युयु ६१७५ हा टेम्पो मंगळवारी गुजरातमधून चिपळूण एमआयडीसीमधील दीपक कंपनीचे हायड्रो क्लोरिक ऍसिड गॅसने भरलेले २४ सिलेंडर घेऊन निघाला होता. महाड तालुक्यातील दासगावजवळ बुधवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो आल्यानंतर त्या मधून अचानक एक सिलेंडरमधून गॅस गळती झाली आणि त्याला आग पकडून संपूर्ण परिसरात धूर पसरला. मात्र, वस्तीच्या बाहेर असल्याने जरी अनर्थ टळला तरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना या धुराचा आणि गॅसचा त्रास होऊ लागला. दीड तासाच्या गॅस गळतीनंतर त्या ठिकाणी अद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी गॅस गळतीवर नियंत्रण आणले.
या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी महाड शहर पोलीस ठाण्याचे फौजदार प्रमोद लांगे, पोह गणेश पवार तसेच महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड चे पोलीस उपनिरीक्षक गणेश भिलारे, पोह मंदार लहाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी महाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणेला पाचारण करत त्या ठिकाणी अग्निशमन दल तैनात ठेवले. सुरक्षा यंत्रणेचे सी. डी. देशमुख, राजू सासणे, शशिकांत राठोड, रोहन तांबे, ए. बी. कुलकर्णी घटनास्थळी पोहचले आणि या होणाऱ्या गळतीवर त्यांनी काही क्षणातच नियंत्रण मिळविले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अनेक अशा प्रकारच्या धोकादायक रसायन मिश्रित पदार्थांची वाहतूक होत असताना प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी व महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी यांचे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या व्यवस्थेतील पदार्थांकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे. केवळ महामार्गावर अवजड वाहतूकदारांकडून हप्ते वसूल करणे व दिवसाढवळ्या वाहन चालकांची लूट करणे या प्रकारामुळे महामार्गावरील आजचा प्रकार घडल्याचे अनेक वाहतूकदारांनी खाजगीमध्ये बोलताना सांगितले.