विश्वास निकम
गोवे-कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील केंद्रस्थानी असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरकडून रुग्णांना उलटसुलट उत्तरे मिळत असुन डॉक्टरांची अरेरावी सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. एका प्रतिष्ठित नागरिकाने डॉक्टरांचा फोन नंबर मागितला तर त्यांना सांगण्यात आले कि आम्ही तुम्हाला फोन नंबर देण्यात बांधील नाही अशी उलटसुलट उत्तरे रुग्णांना देखील मिळत आहेत.
आंबेवाडी आरोग्य केंद्राअंतर्गत ६० ते ६५ गावांचा समावेश असुन काही गाव, वाडया, वस्त्या दुर्गम भागात आहेत. येथील लोकसंख्या ही ६१,४८१ एवढी असुन या आरोग्यकेंद्रात पुरेसा औषध साठाही उपलब्ध नाही. इंजेक्शन व गोळया मेडिकलमधून आणाव्या लागत आहेत. याविषयी ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. परंतु यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतेही टाइमटेबल लावलेले नाही. कर्मचारी वर्ग कोण किती वाजता येते हेही सांगता येत नाही. त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन या दिवसात अनेकांना विंचू, साप यांचा दंश होतो. परंतु याचे इंजेक्शनही उपलब्ध नाही. मग रुग्णांनी जायचे कोठे? याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांकडून केली जात आहे.
या आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्गम भागातील नागरिक उपचारासाठी येतात. असंख्य नागरिकांची परिस्थिती बेताची असल्यामुळे येथे अल्पदरात उपचार होतील या आशेने या प्राथमिक आरोग्य केंद्रात असंख्य नागरिक येतात परंतु त्यांना मेडिकलमधून इंजेक्शन व औषधे आणावे लागत आहेत. मग या आरोग्य केंद्राचा उपयोग काय?
तुकाराम बाळकृष्ण सानप
ज्येष्ठ नागरिक, गौरीनगर, संभे