सलीम शेख
माणगाव : ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद माणगाव तालुक्यात गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी ईदची मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर गळाभेट आलिंगन देत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपगराध्यक्ष राजेश मेहता, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक सिराज परदेशी, प्रा. हर्षल जोशी, शिक्षक शंकर शिंदे, पोलीस कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार बांधव यांच्यासह अनेक हिंदू बांधवानी दूरध्वनी व मोबाईलवरून संदेश पाठवून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
माणगाव तालुक्यातील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला, बाजारटेप मोहल्ला, नाणोरे, लोणशी, मोर्बा, साई, निजामपूर, दहिवली कोंड, दहिवली, तारणा, वडवली, मांजरवणे, नांदवी, पुरार, वणी, मलई कोंड, हारकोल, गोरेगाव, टेमपाले, लाखपाले, देवळी, टोळ, टोळ खुर्द आदी सर्वच गावांतून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथील जामा मशिदीत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची सामुदायिक नमाज अदा केली.