विठ्ठल ममताबादे
उरण : गव्हाण जिल्हा परिषद गटातील गव्हाण, न्हावा, वहाळ, तरघर, उलवे या ग्रामपंचायतमधील प्रकल्पग्रस्तांना सिडकोने दिलेल्या भूखंडावर बिल्डरांच्या ५०% सहभागातून आपली घरे विकसित केली आहेत. म्हणजे या शहराचे मालक येथील प्रकल्पग्रस्त आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे संघटनात्मक प्राबल्य प्रकल्पग्रस्तांचेच आहे. मात्र, शिवसेना (शिंदे गट) याला अपवाद ठरली आहे. शिवसेनेच्या जिल्हास्तरावर वरिष्ठांनी या शहराचा संघटनात्मक प्रमुख म्हणून एक वर्षापूर्वी इथे राहावयास आलेले श्री. वायंगणकर यांना देऊन स्थानिक शिवसैनिकांवर मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे येथील सर्वच पदाधिकारी व शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
याबाबत सर्व स्तरावर येथील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने वरिष्ठांचे लक्ष वेधूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक व पदाधिकारी संतप्त झाले आहेत. जे वरिष्ठ स्तरावरील पदाधिकारी आहेत ते स्वतःच्या गावातही अजूनपर्यंत शिवसेनेची शाखा काढू शकले नाहीत, या राज्याचे कर्तबगार धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देऊन वरिष्ठांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप उलवेतील शिवसेना पदाधिकारी करत आहेत. याबाबत वरिष्ठांनी दखल घेतली पाहिजे असे येथील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना वाटते.