माणगांव पोलीस व साळुंखे रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील कोशिंबळे तर्फे निजामपूर येथील ६१ वर्षीय इसम गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि. २७ जून सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रमेश गेनू नाडकर (वय-६१) उंची अंदाजे ५ फूट २ इंच, रंग सावळा, अंगाने माध्यम, केस काळे, चेहरा उभट, अंगात नेसूस फुल शर्ट फुल पॅन्ट या वर्णनाची व्यक्ती हे घरातून कोठेतरी निघून गेले होते. घरी परत आलेले नव्हते. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यावर ते बेपत्ता झाल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती.
दि. १ जुलै रोजी माणगांव पोलिसांना भादाव ब्रिज खालून नदी पात्रात एक प्रेत वाहून जात असल्याची माहिती मिळाली. तात्काळ माणगांव पोलीस व साळुंखे रेस्क्यू टिमच्या सहकार्याने प्रेत शोधण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच हे प्रेत लोणशी मोहल्ला जवळील नदी पात्रात दिसून आले. सतत पाऊस चालू असल्याने नदी पात्रात पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यात मगर सुद्धा नदी पात्रात असल्याचे निदर्शनास आले. प्रेत काढणे कठीण होते. अखेर माणगांव पोलीस, साळुंखे रेस्क्यू टीम व स्थानिकांच्या सहकार्याने अथक प्रयत्नानंतर प्रेत बाहेर काढण्यात आले. प्रेताची ओळख पटल्यानंतर ते कोशिबळे येथील रमेश नाडकर यांचे असल्याचे समजले. त्यांचे नातेवाईक सुद्धा घटनास्थळी दाखल होते. पोलिसांनी कारवाई पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.