किरण लाड
नागोठणे : निसर्गाचा समतोल साधायचा असेल, भविष्यात ग्लोबल वार्मिंगला तोंड द्यायचे असेल तर झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना अंगीकारून, सामाजिक बांधिलकी जपत श्री शिवसंस्कार प्रतिष्ठान व ग्रुप ग्रामपंचायत पिगोंडे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

श्री जाखमाता मंदिर, वेलशेत येथील परिसरात वृक्षारोपण सोहळा रविवार, दि. २ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरात वेगवेगळ्या जातीची झाडे लावण्यात आली. हा सुंदर आणि सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम श्री शिवसंस्कार प्रतिष्ठान व ग्रुप ग्रामपंचायत पिगोंडे यांच्यावतीने घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पिगोंडे ग्रामपंचायतीचे आजी, माजी सरपंच, सदस्य, गावातील मान्यवर, पर्यावरण प्रेमी, प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
