आंबिवली फाट्यानजिक गोणीत भरून टाकलेला मृतदेह
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबिवली फाटानजिक अज्ञात इसमाची हत्या करून गोणीत भरून टाकण्यात आल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील सहा आरोपींना तीन दिवसात ताब्यात घेत सदर खूनाचा छडा लावण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे आंबिवली फाटा मुंबई-गोवा हायवे लगतच्या नवीन साई सहारा हॉटेलपासून पनवेल बाजुकडे ५०० मीटर अंतरावर गोवा लेनच्या खड्डयात दि. २२/५/२०२४ रोजी सायं. ४ वाजण्याच्या सुमारास एक इसमाचा गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला होता. याबाबत पेण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १६४/२०२४ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तातडीने जावून सदर ठिकाणची पाहणी केली. अज्ञात इसमाच्या खुनाचा छडा लावणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. सदर खूनाचा तपास तातडीने करण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी केली.
स्थानिक गुन्हे शाखा यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उप निरीक्षक विकास चव्हाण व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट दिली व सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड अलिबाग यांनी समांतर तपास सुरू केला. प्रथम गुन्ह्यातील मयताची ओळख पटविणे व आरोपीचा शोध घेणे हे महत्वाचे आव्हान पोलीसांसमोर होते. सदर गुन्ह्याचा तपास करणेकरिता १६ अधिकारी, कर्मचारी यांचे चार तपास पथक तयार करण्यात आली व गुन्ह्याचा तपास सुरू केला. सदर पथकांनी गेले ३ दिवस विश्रांती न घेता अहोरात्र तपास केला व आपापले तपासाचे कौशल्य पणाला लावून त्यानुसार गुप्त बातमीदार तसेच तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेतला. तांत्रिक तपासामध्ये आरोपीत अनुज भालचंद्र मोरे (रा. आजादनगर मांटुगा वेस्ट, मुंबई) असल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठांचे परवागीने एक पथक सदर ठिकाणी जावून अनुज मोरे या आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सदर पथकाने सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा कबुल केला व त्याने सदर गुन्ह्यातील त्याचे साथीदारांचे नावे सांगितली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने आरोपीत मनोज विष्णु गांगुर्डे , गणेश नारायण देशमुख, कानिफनाथ सुरेश म्हात्रे ,सुमीत केशव चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर सदर गुन्ह्यात एक महिला आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एक पथकाने महिला अंमलदारासह जावून रसायनी परिसरातून महिलेला ताब्यात घेतले. एकूण ६ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबुल केला.
सदर चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले आहे की, सदर गुन्ह्यातील मयत अभिषेक (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) हा हॉटेल पंजाबी पॅलेस, पनवेल याठिकाणी काही दिवस कामाला होता. सदर ठिकाणी सदर गुन्ह्यातील महिला आरोपी ही देखील सफाईचे काम करीत होती. सदर मयत हा महिला आरोपीस त्रास देत होता. तसेच तिचे मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर तो काम सोडून निघून गेला होता. तो दिनांक १७/०५/२०२४ रोजी केलेल्या कामाचा पगार घेणेसाठी सदर हॉटेलवर आला होता. त्यावेळी त्याने महिला आरोपीताचा मोबाईल चोरी करून घेवून गेला होता. सदर गुन्ह्यातील ताब्यात घेतलेला आरोपी सदर हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी आहेत. महिला आरोपीने मयताने तिचे बरोबर केलेले वर्तन व चोरलेल्या मोबाईलबाबत माहिती दिली. त्यावरून मॅनेजर आरोपी मनोज गांगुर्डे याने मयतास संपर्क साधून दि. १९/०५/२०२४ रोजी १०.४५ वा. बोलावून घेतले. मयत त्या ठिकाणी आला असता त्यांनी त्यास हॉटेलमध्ये बसवून त्यास सदर महिलेस का त्रास दिला व तिचा मोबाईल का चोरी केला? याबाबत विचारणा करून त्यास सर्व आरोपीत यांनी संगनमत करून लाथाबुक्यांनी त्याला खाली पाडून छातीवर, पोटावर मारले, त्यानंतर तो जागीच मयत झाला. मयत झालेनंतर आरोपीतांनी मयतास हॉटेलच्या फ्रीजमध्ये कोंबून बसविले व एक भाडयाचा टेम्पो बोलावून सदर मयत बसविलेला फ्रीज टेम्पोमध्ये घालून ग्रीन पार्क धाब्यावर आणून ठेवला. त्यानंतर रात्र झाल्यानंतर मयतास गोणी बांधणेसाठी पनवेल येथून आरोपी अनुज चंद्रशेखर मोरे व राज (पुर्ण नाव माहित नाही) यांनी बीग साडी बाजार पनवेल या ठिकाणावरून गोणी खरेदी केली व त्यानंतर फ्रीजमधून मयतास बाहेर काढून त्या गोणीत भरून आरोपी अनुज मोरे व राज (पुर्ण नाव माहित नाही) यांनी गोणीत बांधलेला मृतदेह स्कुटीवरून नेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिला व सर्व आरोपी पसार झाले. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक फौजदार दिपक मोरे, प्रसाद पाटील, पोलिस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रूपेश निगडे, पोलिस शिपाई ईश्वर लांबोटे, स्वामी गावंड, अक्षय जगताप, अक्षय सावंत, बाबासो पिंगळे, लालोसो वाघमोडे, ओंकार सोंडकर, भरत तांदळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत.