• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिरनेर गावातील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

ByEditor

May 26, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
गणपती ही ज्ञान देवता म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात गणेशाची अनेक पुरातन जागृत देवस्थाने आहेत. असेच एक श्री गणेशाचे पुरातन जागृत देवस्थान रायगड जिल्ह्यातील चिरनेर या ऐतिहासिक गावात आहे. भक्ताच्या हाकेला धावून जाणारा चिरनेरचा श्री महागणपती म्हणून ख्याती दूरवर पसरल्याने २६ मे रोजी रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी श्री महागणपती मंदिर परिसरात आपआपल्या कुटुंबासह गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

उरण तालुक्यात असणारे चिरनेर हे गाव निसर्ग संपन्नतेची देणगी लाभलेले सुंदर गाव आहे. पूर्वीच्या काळी मुख्य बाजारपेठ असणारे चिरनेर गाव इंग्रज राजसत्ते विरुद्ध लढल्या गेलेल्या १९३० सालच्या जंगल सत्याग्रहाच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात प्रसिद्ध पावले आहे. मात्र चिरनेरची खरी ओळख आहे ती पुरातन,जागृत अशा श्री महागणपती देवस्थानामुळे. चिरनेर गावात असणारे अत्यंत प्राचीन महागणपती देवस्थान आता गणेशभक्तांची पंढरी झाली आहे. महागणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आपल्या इच्छापूर्तीचा अनुभव वेळोवेळी येत असल्याने या देवस्थानी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते.

२६ मे रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आल्याने उरण तालुक्यातील भक्तांबरोबर पनवेल, नवीमुंबई, ठाणे, कल्याण, मुंबई, पेण या शहरातील हजारो भाविकांनी आपआपल्या कुटुंबासह श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी, पर्यटकांसाठी वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, श्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सदस्य विशेष मेहनत घेत होते. सुट्टीच्या दिवशी रविवारी संकष्टी चतुर्थी आल्याने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!