सलीम शेख
माणगाव : महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे माणगावच्या हरहुन्नरी आदर्श शिक्षिका तथा शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था (रजि.) माणगावच्या सदस्या व उत्कृष्ट सूत्रसंचालिका अपूर्वा अमोल जंगम यांना सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४ ने दि. १४ मे २०२४ रोजी गुरुदक्षिणा हॉल, नाशिक येथे झालेल्या भव्यदिव्य अशा कार्यक्रमात प्रमुख अतिथी सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम कवी अनंत राऊत, अध्यक्ष दीपक चामे, उपाध्यक्षा मेघाराणी जोशी, रायगडच्या निवड समिती सदस्या मधुरा पालांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिक्षिका अपूर्वा जंगम यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलकडून सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन ते तीन शिक्षकांची निवड करण्यात आली होती.
अपूर्वा जंगम यांनी आदर्श शिक्षिका म्हणून माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात आपली विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. विविध शाळांतून शिक्षिका म्हणून काम करताना विध्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देऊन विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या करीत असतात. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच आपण ज्या गावातील शाळेवर सेवा बजावीत असतो त्या गावातील ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन पट संख्या वाढविण्याच्या दृष्टीनेही त्या प्रामाणिकपणे काम करीत असतात. त्याचबरोबर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना एकत्रित करून शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची जन जागृती त्या करीत असतात. या व्यतिरिक्त विविध सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बहारदार असे सुत्रसंचालन करीत असतात.
तंत्रस्नेही शिक्षिका व पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्र अर्थात बालभारती पुणे मार्फत आयोजित व्हर्च्युल क्लासमध्ये सहभाग, एससीइआरटी आयोजित शिकू आनंदेमध्ये योगदान त्यांनी दिले आहे. शिवाय सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. शिक्षिका अपूर्वा जंगम यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शिक्षक पॅनलने घेऊन त्यांना सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४ ने सन्मानित केले.