अमुलकुमार जैन
अलिबाग : आतापर्यंत क्रिकेटमध्ये गुंतलेल्या सट्टा बाजाराने आता राजकीय रिंगणातही उडी घेतली आहे. एकीकडे पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांचा निकाल कसा असेल, त्यासंबंधाने विविध वाहिन्यांवर एक्झिट पोल जाहीर झाले असतानाच फलोदीनेही गेम उघड करताच रायगडमध्येही सट्टा बाजार कमालीचा गरम झाला आहे.
लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर 4 जून रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. उमेदवार, पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. सट्टा बाजारातही लोकसभेचा विजयी उमेदवार कोण असणार? याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांवर कार्यकर्ते पैजा लावत असतानाच हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत सट्टा लावण्यात येत आहे. त्यामुळे उलाढाल वाढली असून सटेट्बाजांना 4 जूनची ओढ लागली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी पार पडलं. तर मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणुक ही चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी पार पडली. एकूण सात टप्प्याचे मतदान झाल्यानंतर देशातील संपूर्ण लोकसभेचा निकाल 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात जनतेने कौल कोणाला दिला आहे? याबाबत उत्सुकता लागली आहे.
रायगड लोकसभा मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात होते. तर मावळ लोकसभा मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात होते. दोन्ही लोकसभा मतदार संघात खरी लढत ही महाविकस आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात होती. मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे आणि महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत आहे. तर रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात प्रामुख्याने लढत होती. याचबरोबर या लढतीत वंचित आघाडी, बहुजन समाजवादी पार्टी तसेच अपक्ष उमेदवारही रिंगणात होते.
रायगड लोकसभा मतदार संघात झालेली निवडणुक ही माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व खासदार सुनील तटकरे यांच्यात असली तरी इतर रिंगणात असलेले उमेदवार किती मते घेतील यांचा अंदाज अंदाज बांधत महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे हे विजयी झाले तर एक रुपयाच्या बदल्यात दोन रुपये चाळीस पैसे, महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते हे विजयी झाले तर एक रुपयाच्या बदल्यात एक रुपया सत्तर पैसे असा सट्टा लागला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर मावळमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे विजयी झाले तर एक रुपयाच्या बदल्यात एक रुपया चाळीस पैसे तर महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे विजयी झाले तर एक रुपयाच्या बदल्यात दोन रुपये दहा पैसे असा सट्टा लावण्यात आला आहे.रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडी उमेदवार यांच्यात झाली.
महायुतीने विकास कामांवर तर महाविकस आघाडी संविधान बचाव या मुद्द्यावर प्रचार केल्याने ही लढत अधिक रंगतदार पाहायला मिळाली. त्यामुळे मावळ व रायगड लोकसभेचा निकाल काय लागणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. या दोन्ही मतदारसंघात कोण उमेदवार निवडून येणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात असून कार्यकर्त्यांमध्ये हजारांपासून ते लाख रूपयांपर्यंत पैजा लागल्या आहेत. तर सट्टा बाजारात देखील विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनाच जादा बोली लागल्याचे सांगितले जाते. वास्तविक पाहता जसजसा मत मोजणीचा दिवस जवळ येत आहे तसतसे सट्टा लावणाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्रात ‘भेंडवळ’ सुपरिचित आहे. वर्षानुवर्षांपासून ज्याप्रमाणे भेंडवळ मांडली जाते आणि पीकपाण्याचे भाकित केले जाते त्याचसारखे राजस्थानमधील फलोदित राजकारण आणि निवडणुकांचा सट्टा खुलतो. देशभरातील सटोडे फलोदीच्या भाकितांवर डोळे बंद करून विश्वास करतात आणि सट्टा लावतात. |
विशेष म्हणजे आतापर्यंत सट्टाबाजार आधी विश्वचषक आणि टी-२०त गुंतला होता. मात्र, आज एक्झिट पोल आणि फलोदीने आकडे जाहीर करताच सट्टा बाजारानेही आपली दुकानदारी सुरू केली आहे. |