सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीत शासकीय वसाहतीशेजारी कुंडलिका नदीच्या पात्रात एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सदरची घटना शनिवार, दि. २५ मे २०२४ रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर पोलीस पाटील प्रदीप महीपत म्हामुणकर (वय ५०, रा.म्हसेवाडी ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत इसम संकेत संजय परळकर (वय २१, रा. बहादूरपुरा कंधार, जि. नांदेड, सध्या रा. दत्तवाडी, जि. पुणे) हा भिरा गावाच्या हद्दीत शासकीय वसाहती शेजारी कुंडलिका नदीच्या पात्रात बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. त्यास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात २४/२०२४ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.