अमूलकुमार जैन
अलिबाग : सातबारा उताऱ्यात वारस म्हणून नोंद करण्यासाठी महिला तलाठी पल्लवी यशवंत भोईर, (वय 39 वर्षे, तलाठी, सजा बामनोली (अति कार्यभार), (मूळ नेमणूक सजा खंडाळा, तालुका अलिबाग जिल्हा रायगड) हिने ५ हजारांची लाचेची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच घेताना रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात रंगेहाथ पकडण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील तक्रारदार यांची अलिबाग तालुक्यातील लोणारे येथे ग.नं. 40/1, क्षेत्र 0-57-0 अशी वडीलोपार्जित मिळकत आहे. सदर मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस म्हणून नोंद करणे करता तक्रारदार यांच्याकडे 5,000/- रुपये लाचेची मागणी करून आरोपी लोकसेवक महिला तलाठी पल्लवी यशवंत भोईर हिस ५ हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नवनाथ चौधरी, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस शिपाई सचिन आटपाडकर, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. असे आवाहन लाच लुचपत विभागाचे उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे.